
सामना प्रतिनिधी। बीड
पुण्याहून बीडला निघालेल्या शिवशाही बसमधून फुकट प्रवास करू पाहणाऱ्या मद्यधुंद प्रवाशाला बस चालक आणि वाहकाने तिकीट घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने प्रवाशाने बीड येथे बस पोहचल्यानंतर वाहक- चालकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून जखमी वाहक- चालकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहकाचे नाव ज्ञानेश्वर साळूंके असून चालकाचे नाव हनुमान वाघमारे असे आहे.
ज्ञानेश्वर आणि हनुमान हे दोघे शिवशाही बस (क्रं. एमएच 06 बी डब्ल्यू 1003) घेऊन रविवारी रात्री बीडकडे येत होते. त्याचवेळी नगर येथून एक प्रवासी या बसमध्ये चढला. वाहकाने त्याला तिकीट घेण्यास सांगितले. पण प्रवाशाने तिकीट घेण्यास टाळाटाळ केली. मद्य प्राशन केलेल्या या प्रवाशाने बर्याच वेळा नंतर तिकीट मागितले. यावेळी वाहक साळुंके आणि त्याच्यात बाचाबाची झाली. प्रवाशाने वाहक आणि चालकाला बीड पोहचल्यावर माणसे बोलावून मारण्याची धमकी दिली. दरम्यान आष्टी येथे आल्या नंतर वाहतूक नियंत्रकाना याची माहिती देण्यात आली. यावेळी या प्रवाशाने आमचे भांडण मिटले असल्याचे सांगितले. रात्री 12 वाजेच्या दरम्यान बस बीड येथे पोहचली. सर्व प्रवाशी उतरून गेल्यानंतर वाहक-चालक बस जमा करून घरी निघाले असता त्या प्रवाशाने बोलाविलेल्या आठ ते दहा जणांनी या दोघांवर हल्ला चढविला. लाठ्या काठीने हल्ला केल्याने या दोघांनाही जबर मार लागला. चालक हनुमान वाघमारे यांचा हात फॅक्चर झाला आहे.
या बाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. कामगार सेनेचे विभागीय सचिव राहुल बहिर, आगारप्रमुख पवार साहेब स्थानक प्रमुख महाजन व विविध संघटना पदाधिकारी यांनी जखमींची भेट घेतली. या प्रकरणी आरोपीस अटक न केल्यास एसटी कर्मचारी तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबिण्याची शक्यता आहे.





























































