
बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाची पाहणी आणि प्रशासकीय आढावा घेण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री बीड मध्ये दाखल होत आहेत. सोबत विविध खात्याचे मंत्री उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गत आठवड्यातच दुष्काळ पाहणीसाठी बीड मध्ये येणार होते मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा आठवडाभरासाठी पुढे ढकलण्यात आला होता. आता सोमवारी मुख्यमंत्री बीड जिल्ह्यात दाखल होत आहेत. ते बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाची पाहणी आणि प्रशासकीय आढावा घेणार आहेत. या दृष्टीकोनातून प्रशासन कामाला लागले आहे. दुष्काळ पाहणीसाठी येत असले तरी ते या सोबत जाहीर झालेल्या विविध अनुदानाची सद्य परिस्थिती जाणून घेऊ शकतात. काही तालुक्यात 2016 – 2017 चा विमा नाही. याच वर्षातील अतिवृष्टीचे अनुदान नाही. गत वर्षीच्या बोन्ड अळीचे अनुदान ही शेतकऱ्याच्या पदरात पडले नाही. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासकीय अनुदाना व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या ही योजनेचा लाभ पदरात पडला नाही. तर वडवणी तालुक्याला पीक विम्यामधून वगळण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे काय उत्तर आहे हे महत्वाचे ठरणार आहे.






























































