
सामना प्रतिनिधी । जिंतूर
जिंतूर तालुक्यातील सांवगी म्हाळसा (एलदरी) वनविभागाच्या हद्दीतील सुमारे तीन ते चार एकर वनजमीनीला अचानक शनिवारी दुपारी ठीक 12:30 वाजता भीषण आग लागली. सायंकाळी 5 वाजता आगीवर ग्रामस्थांनी नियंत्रण मिळविले. तोपर्यंत या आगीमध्ये रोपवाटिकेचे लाखोंचे नुकसान झाले.
एलदरी येथील वनविभागाच्या संचीत रोपवनला अचानक आग लागली. सुरूवातीला ही आग आटोक्यात होती परंतु हवेमुळे या आगीने भीषण स्वरूप धारण केले आणि ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे त्या बाजूला व एलदरी धरणाच्या दिशेने आग वाऱ्याच्या वेगाने पसरत होती. एलदरी येथील काही ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांना कॉल केल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी सुरवातीला कॉल उचलला नाही. वारंवार फोन करून देखील अधिकारी फोन उचलत नसल्या कारणाने तेथील ग्रामस्थांनी ती आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात येत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी जिंतूर येथील अग्निशामक ऑफिसला फोन केला आणि 60% आग विझल्यानंतर अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.
एवढी मोठी भीषण आग लागून देखील येथील वन विभागातील एक अधिकारीसुद्धा या ठिकाणी पोहचला नाही आणि केवळ फोनवरच घटनेची चौकशी करत राहिले. यावरून असे दिसून येथे की, प्रत्यक्ष घटनास्थळी न जाताच केवळ बसल्या जागेवरून कागदी घोडे नाचविण्याचे काम या परिक्षेत्रातील वन अधिकारी काळे, वनपाल चंद्रमोरे मँडम, वनरक्षक कांबळे हे करत होते, असे ग्रामस्थांनी सांगितले.
या आगीमध्ये सुमारे 4 ते 5 एकरच्या आसपास रोपवटीकेसह ठिबक सिंचन योजनेचेही नुकसान झाले आहे.































































