भाजपची ‘धुळे’वड… धुळ्यातील विजय संकल्प मेळाव्यात आमदार गोटेंच्या कार्यकर्त्यांचा राडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धुळे

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आयोजित ‘विजय संकल्प’ मेळाव्यातच भाजपची राडेबाजी पाहायला मिळाली. मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असतानाच आमदार अनिल गोटे यांची अचानक ‘एण्ट्री’ झाली आणि त्यानंतरच वादाला सुरुवात झाली. महाजन यांच्या भाषणानंतर गोटे यांना बोलूच दिले नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्यात वादावादी झाली. या गोंधळातच गोटे यांनी स्टेजवर हिरामण गवळी यांच्या थोबाडीत लगावली. एवढेच नव्हे तर गोटेंच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर घुसून जोरदार घोषणाबाजी केली.

धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि विजय संकल्प मेळावा शनिवारी सायंकाळी झाला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. यानंतर जमनालाल बजाज रोडवर विजय संकल्प मेळावा सुरू झाला. मंत्री गिरीश महाजन मेळाव्याला मार्गदर्शन करताना आमदार अनिल गोटे सभास्थळी पोहोचले. त्यावेळी उपस्थित सर्वच अवाक झाले.

मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात, अनेकजण कमरेखालची भाषा वापरतात, असा टोला मारला.

महाजन यांच्या भाषणानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अध्यक्षीय भाषण करतील असे सूत्रसंचालक हिरामण गवळी यांनी सांगितले. त्यानंतर आमदार अनिल गोटे यांनी माइकवर बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल यांनी आमदार गोटे यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

स्टेजवरील कार्यकर्त्यांसह खाली उभे असलेले कार्यकर्ते स्टेजवर चढले. शाब्दिक वादानंतर सुमारे पाच ते दहा मिनिटे स्टेजवर गोंधळ सुरू होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आमदार गोटे कार्यकर्त्यांच्या गराडय़ात स्टेजवरून खाली उतरले.

अनिल गोटे यांनी रविवारी रात्री उशिरा जाहीर सभा घेऊन धुळय़ाच्या महापौरपदासाठी स्वतःच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे धुळे भाजपात फूट पडली आहे. आगामी काळात एकनाथ खडसे यांनी गोटे यांना साथ दिली तर खान्देशात भाजपला खिंडार पडू शकते.

पोलीस अधिकाऱयावर हल्ला करणाऱ्या गुंडाचा प्रवेश

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीश महाजन तसेच जयकुमार रावल या तिघा मंत्र्यांच्या उपस्थितीत देवा सोनार या गुंडाला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. सोनारवर पोलिसांवर हल्ला करण्याचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तडीपारीच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

मतांसाठी पक्षात गुंड घ्यावेच लागतात – दानवे

विचारधारा बदललेली नाही, एखादा गुंड व्यासपीठावर आला म्हणजे त्याला प्रवेश दिला असा त्याचा अर्थ होत नाही. त्याने व्यासपीठावर येणे हे मतदारवाढीपुरते मर्यादित आहे. मतांसाठी पक्षात गुंड घ्यावेच लागतात, असा खुलासा प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी नाशकात केला.