धुळे पालिकेची लुटमार करणाऱ्या लबाडांपासून सावध रहा- आमदार अनिल गोटे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धुळे

महापालिकेची लुटमार करणाऱ्या वाळू, डांबर, मोबाईल चोरांबरोबरच आदिवासींच्या जमिनी हडप करणाऱ्या चोरलबाडांना घेऊन पक्षनेते निवडणूक लढणार असतील तर त्यांच्यापासून सावध राहा. अनोळखी दिसला तर त्याला फटके द्या. निवडणुकीत जर कुणाला आमच्या उरावर बसविण्याचा प्रयत्न केला तर अद्दल घडवू, असा इशारा देत आमदार अनिल गोटे यांनी स्वत:च महापौरपदाची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपची अक्षरश: कोंडी झाली आहे.

धुळे महापालिकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील पक्षीय राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत. याशिवाय इतर काही राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षात येणाऱ्यांना आमदार गोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विरोध आहे. परंतु गोटे यांच्या विरोधाला न जुमानता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्याच्या कार्यकारी निवड मंडळावरून आमदार गोटे यांना हटविले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार गोटे यांनी रविवारी रात्री धुळ्य़ातील संतोषी माता मंदिर चौकात जाहीर सभा घेत प्रदेशाध्यक्ष दानवेंसह संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांच्यावर गंभीर दोषारोप केले. रेल्वेचा साडेनऊ हजार कोटींचा प्रकल्प 47 हजार कोटींवर नेला आहे, असे म्हणत आमदार गोटे यांनी डॉ. भामरे यांच्यावर टीका केली. मंत्री म्हणून काम करणाऱ्यांकडून सध्या आर्थिक लूट सुरू आहे, असा आरोप आमदार गोटे यांनी केला.

पंडित दिनदयाळ उपाध्याय, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, जनसंघासाठी आयुष्य खर्ची पाडणाऱ्या उत्तमराव पाटलांची विचारधारा असलेला भारतीय जनता पक्ष कोठे आहे हे विचारण्यासाठी मी दानवेंकडे गेलो होतो, पण त्यांनी ऐकून घेतले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रामाणिक कार्यकर्त्यांला संधी मिळायला हवी. मी हाती घेतलेली कामे शासकीय दरपत्रकापेक्षा कितीतरी टक्क्याने कमी आहेत. तेव्हा विकास कोण आणि कसा करेल हे लक्षात घ्या. चोर-लबाडांना सोबत घेऊन भाजप नेते महापालिका निवडणुकीत शहरात फिरतील. कदाचित ते तुमच्या घराची रेकी करतील. रात्री-बेरात्री येऊन लुटमार करतील. तेव्हा सावध राहा, असे म्हणत महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आता मीच उमेदवार असेल अशी घोषणाही आमदार गोटे यांनी केली. त्या वेळी उपस्थितांनी मोठ्य़ा प्रमाणात जल्लोष करीत प्रतिसाद दिला.

19 नोव्हेंबरला गोटे आमदारकीचा राजीनामा देणार
राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी जनजागृती यात्रा काढली होती. त्यामुळे 1995 ला भाजपला सत्ता मिळाली, पण आता मताधिक्य वाढीसाठी गुंडांना पक्षात घेत आहेत, असे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे म्हणणेही चेष्टा आहे. त्यामुळे मी विधिमंडल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 19 नोव्हेंबरला आमदार पदाचा राजीनामा देणार आहे, अशी माहिती भाजप आमदार अनिल गोटे यांनी दिली.