
>> नितीन फणसे
स्वतःचं सुसज्ज ऍप… त्या माध्यमातून तरुणाईशी जोडलं जाणं… मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर याच ओढीतून आज स्वतःचं ऍप लॉन्च करणार आहेत…
विनोदी भूमिका करायची तर मनात विनोदी वृत्ती असायला हवी, असं साधंसोपं आणि सरळ गणित विजय पाटकर यांचं आहे. म्हणूनच अभिनय असो, निर्मिती असो की अगदी दिग्दर्शन असो, ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले आहेत. चित्रपट महामंडळाचे ते काही काळ अध्यक्षही होते, पण कुठेतरी आपण कमी पडतोय, आजच्या तरुण पिढीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही ही खंत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच आता ते चक्क स्वतःचे पर्सनलाईज्ड ऍप सुरू करणार आहेत. आजच त्यांच्या या ऍपचे अनावरण होणार आहे. याच निमित्ताने एक चांगला अभिनेता, अनेक विनोदी चित्रपटांचे दिग्दर्शक आणि मुख्य म्हणजे एक चांगला माणूस असलेल्या विजय पाटकरांशी चर्चा केली.
मुलाखतीसाठी फोन केला तेव्हा ‘‘बोल नितीन…’’ असा आपुलकीचा आवाज समोरून आला आणि मी थक्कच झालो. ‘‘ऍप सुरू करताय… त्याबाबत बोलायचं होतं’’ अशी मी सुरुवात केली. तेही मोकळेपणाने बोलू लागले. आजच्या काळात फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप अशी संपर्काची अनेक माध्यमं उपलब्ध असताना स्वतःचं ऍप बनवण्याची गरज पाटकरांना का भासली असावी, हा प्रश्न मनात रेंगाळत होता. मी विचारणार तेवढय़ात त्यांनीच त्याबाबत बोलायला सुरुवात केली.
ते म्हणाले, आजची तरुण पिढी डिजिटली खूप स्ट्राँग आहे. माझा मुलगा असो की आणखी कुणी, आपल्याला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर आपणही डिजिटली स्ट्राँग व्हायलाच हवं असं मला वाटायला लागलं. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चनही आज 77व्या वयात रात्री 2 ते 4 या वेळेत ऑनलाइन असतात. त्यांना खरं तर चाहत्यांशी कनेक्ट राहायची काय गरज, पण ते राहतात. कारण आजच्या काळाची ती गरज आहे. येत्या काही काळात मी जे प्रोजेक्ट करणार आहे ते खूप मोठे आहेत. ते या तरुण पिढीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. म्हणून हे ऍप बनवण्याची योजना आखलीय असं त्यांनी स्पष्ट केलं.
विजय पाटकर यांचे हे पर्सनलाईज्ड ऍप चालवण्याची जबाबदारी ‘किनशिप हब’ या कंपनीने स्कीकारली आहे. अभिनय, दिग्दर्शन या सगळ्यातून पाटकरांना ऍप चालवायला कुठला वेळ मिळणार? म्हणून त्या कंपनीवरच त्यांनी हे काम सोपवलं आहे. फक्त त्यांना इनपुट्स देण्याचं काम पाटकर स्वतः करणार आहेत. या ऍपच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या थेट संपर्कात राहू शकणार आहेत. काही ठरावीक वेळ ते स्वतःही ऑनलाइन असतील, पण ऍपवरील नियंत्रण विजय पाटकर यांच्याकडेच राहणार आहे. यापुढे ते काय प्रोजेक्ट करणार आहेत, मग त्यात हिंदी सिनेमा असो की मराठी सिनेमा… सगळ्याची खडान्खडा माहिती त्यांच्या चाहत्यांना या ऍपद्वारे मिळणार आहे. काल पाटकरांनी काय केले, आज काय करणार आहेत ही ताजी माहितीही चाहत्यांना एका क्लिकवर मिळणार आहे. नुकतेच त्यांनी रोहित शेट्टी यांच्या ‘सिम्बा’ या आगामी सिनेमातील आपल्या भूमिकेचे काम संपवले आहे. या शूटिंगच्या वेळच्या गमती जमतीही लोकांना त्यांच्या या ऍपमध्ये वाचायला मिळतील.
फक्त विजय पाटकर!
स्वतःच्या ऍपचे महत्त्व स्पष्ट करताना विजय पाटकर म्हणाले, फेसबुकमध्ये धडाधड पोस्ट्स पडत असतात. आपण बहुतेक तर उघडतही नाही. पटापट लाइक करून पुढे जातो. नंतर आपल्याला ते आठवतही नाही. व्हॉट्स ऍपचंही तसंच. त्यातल्या ग्रुप्समध्ये 40 का 45 सदस्य असतात. त्यातले दोघे तिघे बोलत असतात. त्यावेळी इतरांना त्यात रस नसतो, पण ऍपमध्ये फक्त विजय पाटकर असेल. येथे चर्चा होईल ती माझ्याबद्दल आणि फक्त माझ्याच सिनेमांची.



























































