खो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kho-kho-sangali

सामना प्रतिनिधी । सांगली

पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली व ठाणे या संघांनी पुरुष व महिला गटातून आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत 55 व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. याचबरोबर पुरुष गटातून मुंबई उपनगर, नाशिक, सोलापूर, तर महिला गटातून रत्नागिरी, नगर, सातारा या संघांनीही आगेकूच केले.

कवठेपिरान (ता. मिरज) येथील हिंदकेसरी मारुती माने किद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या उप उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने जळगावचा 21-11 असा एक डाव 10 गुणांनी धुव्वा उडवला. मुंबईच्या प्रसाद राडीयेने 2:40 मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले, पीयूष घोलमने 2:10 मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले व नीरव पाटीलने 2:10 मि. संरक्षण करत एक गडी बाद केला. तर जळगावच्या स्वप्नील पवार (4 गडी) व हर्षल बेडिस्कर (3 गडी) यांनीच लढत देण्याचा प्रयत्न केला. दुसऱया सामन्यात धाराशीवने पालघरवर 11-8 असा एक डाव तीन गुणांनी विजय संपादन केला. धाराशीवच्या अविनाश आचार्यने 2:40 मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले, राजाभाऊ शिंदेने 1:50, 2:10 मि. संरक्षण करत एक गडी बाद केला, लखन चव्हाणने 1:10, 2:10 मि. संरक्षण करत एक गडी बाद केला तर पालघरच्या शैलेश मर्गजने 1:40 मि. संरक्षण करत एक गडी बाद केला व सचिन सोनारने 1:30 मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले. आणखी एका सामन्यात मुंबई उपनगरने बीडचा 13-8 असा एक डाव 5 गुणांनी पराभव केला. उपनगरच्या अनिकेत पोटेने 3:50 मि. संरक्षण करत 4 गडी बाद केले, हर्षद हातणकरने 2:30 मि. संरक्षण करत एक गडी बाद केला व अक्षय भांगारेने 2:20 मि. संरक्षण केले व विजयावर शिक्कामोर्तब केले. बीडच्या दीपक घोडकेने 1:20, 1:10 मि. संरक्षण करत एक गडी बाद केला व गौरव जोगदंडने 3 गडी बाद करत चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला.

महिलांच्या सामन्यात यजमान सांगलीने मुंबई उपनगरावर 10-9 असा तब्बल 7:10 मि. राखून एक गुणाने विजय संपादन केला. सांगलीच्या मोनाली शिंदेने 2:20 संरक्षण केले. धनाश्री भोसलेने 1:40, 2:10 मि. संरक्षण केले व कोमल शिंदेने 1:50 मि. संरक्षण करताना 3 बळी मिळवत संघाला विजयपथावर नेले.

उपनगरच्या आरती कदमने अष्टपैलू खेळ करताना दोन मि. संरक्षण करून तब्बल 5 बळी मिळवले व साक्षी वाफेलकरने दोन्ही डावांत 1:20-1:20 मि. संरक्षण केले, मात्र ते आपल्या संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत. आणखी एका सामन्यात रत्नागिरीने बीडचा 17-05 असा एक डाव 12 गुणांनी धुव्वा उडकला. रत्नागिरीच्या आरती कांबळेने 3:40 मि. संरक्षण करत चार बळी मिळवले.