‘हर हिन्दू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ उद्धव ठाकरे यांनी दिला नवीन नारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशभरात चैतन्याची लाट उसळली आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज होत असतानाच मुंबईतील शिवसेना भवनात महत्वाच्या बैठका सुरू आहेत. अयोध्या दौऱ्यासंदर्भात आज एक अत्यंत महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीस महाराष्ट्रसह देशभरातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले आणि बैठकीनंतर त्यांनी ‘हर हिन्दू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’, असा जोरदार नारा दिला अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज दिली. हा नारा दिल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत आणि शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

अति विराट अशा दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर शिवसैनिक कामाला लागले. देशाच्या कानाकोपऱ्यात हा संदेश पोहोचला. उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार असल्याने देशभरातील साधू-संतांनी आनंद व्यक्त करत, त्यांच्या या निर्णयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसैनिकांसोबतच देशभरातील हिंदू उद्धव ठाकरेंसह अयोध्येत पोहोचण्यास उत्सुक आहे. दौऱ्यातील कार्यक्रम निश्चित झाला असून त्याचे नियोजन आणि अन्य महत्वाच्या विषयांवर उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत मार्गदर्शन केलं.