
सामना ऑनलाईन । मुंबई
तृतीय वर्ष विधी शाखेची (एलएलबी) ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून अद्याप हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. कॅप राऊंडमध्ये नोंदणी झालेल्या 25 हजार 791 विद्यार्थ्यांपैकी 13 हजार 785 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला असून यंदा 535 जागा रिक्त राहणार आहेत.
जूनमध्ये पार पडलेल्या विधी शाखेच्या सीईटीमध्ये 32 हजार 323 विद्यार्थी पात्र ठरले होते, तर कॅप राऊंडमध्ये 25 हजार 791 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. आतापर्यंत पार पडलेल्या चार प्रवेशफेऱ्यांसाठी एकूण 14 हजार 320 जागा उपलब्ध होत्या. यांपैकी 13 हजार 785 म्हणजेच 96 टक्के प्रवेश झाले आहेत. जागा असूनही यापुढे विधीचे प्रवेश होणार नाहीत असे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा विभागाने जाहीर केले आहे. राज्यात सोलापूर वगळता इतर जिह्यात विधी शाखेच्या जागा शिल्लक आहेत. सोलापुरात उपलब्ध असलेल्या 240 जागा पूर्ण भरल्या आहेत.
जिल्हानिहाय रिक्त जागा
जिल्हा प्रवेश
झाले उपलब्ध जागा जागा रिक्त
मुंबई 5432 5520 88
एसएनडीटी 227 240 13
पुणे 2780 2980 200
कोल्हापूर 748 780 32
नांदेड 915 960 45
संभाजीनगर 996 1020 24
जळगाव 595 600 5
अमरावती 861 900 39
नागपूर 826 900 74
गडचिरोली 180 165 15
विधी शाखेची प्रवेशप्रक्रिया संपुष्टात आली असून तरीदेखील प्रवेश झाल्यास संबंधित कॉलेज आणि विद्यार्थी त्यास जबाबदार राहतील असे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा विभागाने जाहीर केले आहे.
रिक्त जागा कॉलेजस्तरावर भरण्याची परवानगी द्या
कॅप राऊंडपूर्वी विधी शाखेचे प्रवेश ऑफलाइनही होतात, पण याची बहुसंख्य विद्यार्थ्यांपर्यंत माहितीच पोहोचलेली नाही. त्यामुळे मेरिट असूनही विद्यार्थी नजीकच्या कॉलेजपासून वंचित राहतात. मेडिकलनंतर विधी शाखेला विद्यार्थ्यांची पसंती मिळत असून जागा रिक्त ठेवण्यापेक्षा कॉलेजस्तरावर मेरिटनुसार त्या भरण्याची सूट दिल्यास शेकडो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, असे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले.






























































