
सामना प्रतिनिधी । मुंबई
अधिवेशनाचा पहिलाच दिवस सरकारसाठी अग्निपरीक्षा घेणारा ठरला. विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात प्रशासनाने अक्षम्य दिरंगाई केल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला सळो की पळो करून सोडले. पहिल्या दिवशी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांनी संबंधित अधिकाऱयाच्या निलंबनाचीही मागणी केली. गायकवाड यांच्या कुटुंबीयांशी तब्बल 30 तास संपर्क साधला गेला नाही. त्यानंतरही त्यांना आणखी 2 तास थांबण्यास सांगण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत प्रकरणावर पडदा टाकला.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड आणि माजी विधान परिषद सदस्या उमेशा शंकर पवार यांच्या निधनाबद्दल सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी शोकप्रस्ताव मांडला. अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग घेतला, तसेच त्यांनी पक्षवाढीसाठी कठोर मेहनत घेतली अशा शब्दांत पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कॉम्रेड गायकवाड आणि उमेशा पवार यांनाही त्यांनी आदरांजली अर्पण केली. याशिवाय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवसेना सदस्य दिवाकर रावते, नीलम गोऱहे, मनीषा कायंदे, दराडे, कॉम्रेड जगताप, जयंत पाटील, कपिल पाटील, जोगेंद्र कवाडे, सुरेश धस, मोपलवार यांनीही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, कॉम्रेड माधवराव गायकवाड आणि उमेशा पवार यांना आदरांजली अर्पण केली. परिस्थितीमुळे नेतृत्वाच्या मध्ये आव्हाने येतात त्याला सामोरे जाणारे नेतृत्व म्हणून वाजपेयींकडे पाहिले पाहिजे असे गोऱहे यावेळी म्हणाल्या. दरम्यान, गायकवाड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क का साधला गेला नाही असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केला. तसेच संबंधित अधिकाऱयाला तत्काळ निलंबित करण्याची मागणीही केली. तर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार आहेत की नाही हे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना निरोपच मिळत नाही. ही अत्यंत दुःखद घटना असल्याचे नीलम गोऱहे म्हणाल्या. शेवटी सभापती रामराजे निंबाळकर यांनीही आदरांजली अर्पण करून कामकाज तहकूब केले.
तालिका सभापतीपदी नीलम गोऱहे, दरेकर यांची नियुक्ती
सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रवीण दरेकर, नीलम गोऱहे, जगन्नाथ शिंदे, अमरनाथ राजूरकर आणि दत्तात्रय सावंत यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती केली. तर सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी महादेव जानकर, भाई गिरकर, जयंत पाटील, अनिल परब, शरद रणपिसे, बाबजानी दुर्राणी, मनीषा कायंदे, नीलय नाईक, रमेश पाटील , रामराव पाटील, वजाहत मिर्झा आणि अरुण अडसद या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला.




























































