उरण परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी। उरण

उरण परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. नवघर गावातील रोनक तांडेल या तीन वर्षांच्या मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला असून त्यात तो जखमी झाला आहे. या घटनेमुळे सध्या गावात कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे.

उरण तालुक्यात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रोज चार-पाच नागरिकांचा ही कुत्री चावा घेत आहेत अशी माहिती खुद्द उरण तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यात आज नवघर गावातील रोनक हा तीन वर्षांचा मूलगा घरा समोरील अंगणात खेळत होता. त्याचवेळी तेथे आलेल्या भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला व त्याच्या हाताचा चावा घेतला.

रोनकवर तात्काळ उपचार करण्यात आले आहेत. याबाबत रोनकचे वडील नवल तांडेल यांनी नवघर ग्रामपंचायत,उरण पंचायत समितीने नवघर गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. याबाबत विचारणा केली असता नवघर गावात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त उरण पंचायत समितीने, पशुसंवर्धन विभाग यांनी करावा अशी मागणी नवघर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली असल्याची माहिती नवघर ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती चोगले यांनी दिली.