विज्ञानाचे वास्तव मांडणारे लेखन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रो. डॉ. शशिकान्त लोखंडे

ख्यातनाम पत्रकार, साक्षेपी विचारवंत, डाव्या चळवळींचे प्रेरक कुमार केतकर यांच्या 43 स्फुटलेखांचे संकलन ‘विश्वामित्राचे जग’ या स्फुटलेख संग्रहात आहे. ज्यांनी त्यांना उत्तरांपलीकडल्याही प्रश्नांचा वेध घ्यायला शिकवले त्या कृष्णमूर्तींना हा संग्रह अर्पण केला आहे. विज्ञान आणि वैज्ञानिक घडामोडी, प्रभाव-प्रसार यांचे विश्लेषण पुनःदर्शन हे एक सूत्र घेऊन या 43 लेखांची बांधणी झाली आहे. त्यामुळे या सर्वच लेखांना अंतर्गत सूत्र आहे. विज्ञानाचे अनेक ‘कोन’, अनेक बाजू सर्वच लेखांत उठून दिसतात. लौकिक अर्थाने कुमार केतकर विज्ञानाचे विद्यार्थी नाहीत. समाजशास्त्र- मानसशास्त्राचे ते विद्यार्थी आहेत. ते राजकारण- अर्थकारणाचे अभ्यासक आहेत. व्यावसायिक पत्रकार आहेत त्यामुळे वास्तव जगाकडे, भूगोल- इतिहासाकडे ते अधिक कुतुहलाने पाहू शकले आहेत, हे सर्वच लेखांवरून जाणवते. जगभर प्रवासाची संधी मिळाल्याने त्यांच्या विचारभूमीला सकसता लाभली आहे. त्यामुळे ‘विश्वामित्राचे जग’मध्ये बरंच काही लाभते. मुळात हे संकलित लेख वृत्तपत्रीय अग्रलेख असून त्यांना निबंधाचे, लालित्याचे स्वरूपही आहे. तथाकथित अग्रलेखातील रूक्ष विवेचन वा कंटाळवाणी भाषा मात्र या संग्रहात कुठेच नाही. ‘वाचनीयता’ हा एक महत्त्वाचा पैलू या सर्वच लेखांना आहे. ‘अथांगाच्या शोधा’पासून त्याचा विचार प्रवास सुरू होतो आणि ‘सर्वे पि सुखि नः सन्तु!’पर्यंतच्या पसायदानापर्यंत येऊन ठेपतो. विशेष वाचकांना त्यामधून वेगवेगळ्या विज्ञान घटक-घटनांची, विचारवंतांची, वैज्ञानिकांची, प्रकल्पांची नव्याने माहिती मिळते. ‘बोध देणे’ हा या लेखांचा हेतू नसून विज्ञानाबद्दल समाजाचे उद्बोधन व्हावे हा प्रमुख हेतू आहे असे दिसते.

संग्रहाच्या प्रारंभीच्या ‘मनोगत’मध्ये कुमार केतकर यांनी धर्म आणि विज्ञान या द्वंद्वाची कुशलतेने उकल केली आहे. धर्माचेही एक विज्ञान असते ते मनोसापेक्ष आहे आणि विज्ञानाचाही एक धर्म आहे तो प्रयोगसापेक्ष. माणसाच्या मनातील विश्वधर्माचे आणि मनोबाहय़विश्व विज्ञान-कृतीचे. विज्ञानामागेही आत्मिक सामर्थ्य असले पाहिजे असे ते सुचवितात. नीतिमूल्ये विज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत. बुद्धधम्मीय जपानने अण्वस्त्र निर्माण केलीच. स्वररक्षण, समाजविकसन हे लक्ष्य त्यामागे आहे. ते म्हणतात, ‘खरे तर ‘विज्ञान विरुद्ध अध्यात्म’ असा वाद असताच कामा नये. अध्यात्मात जितके गूढ आहे तितकेच विज्ञानात आहे. अध्यात्मात जितके आव्हान आहे तितकेच आव्हान विज्ञानात आहे. व्यक्तिगत साक्षात्कार वा अनुभूती, खरी वा खोटी हा सवालच विज्ञानात नाही. अध्यात्माचा दृष्टिकोन विशाल असेल तर ते विज्ञानाला सामावून घेऊ शकले पाहिजेत. विज्ञानवाद्यांनी दुसऱ्याच्या अनुभूतीला तुच्छतेने लेखणे हेही वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही (पृ. सात). धर्म हे एक सामाजिक आहे. विज्ञान हा एक शोध आहे. त्याला सर्वमान्य ग्रंथ नाही. विज्ञानामुळे महायुद्धे, शीतयुद्धे, अण्वस्त्रांचा प्रसार झाला आणि जग असुरक्षितही झाले. याबरोबर विज्ञानानेच जगाची मनोबाह्य अफाट प्रगतीही आहे हे ते लेखांमधून दाखवून देतात. या सर्वच अग्रलेखांमध्ये काही पर्यायांमुळे सैद्धांतिक चर्चा येत नाही याचे भान कुमार केतकरांना आहे.

प्रगल्भ विज्ञानवादी विचार रुजविण्यासाठी नैमित्तिक अर्थाने हे अग्रलेख लिहिले गेले आहेत. त्यात विशेषत्वाने माध्यम- माहिती क्रांतीसंबंधातील काही अग्रलेख आहेत. वैज्ञानिकांनी अनेकदा मानवी मूल्यांना पायदळी तुडवून जगावर विध्वंस लादला आहे तथापि बहुतेक वैज्ञानिकांनी धर्माबद्दल व धर्मवादाबद्दल अनुदार, कठोर वा क्रूर दृष्टिकोन घेतलेला नाही. न्यूटन, आईन्स्टाईनसारख्यांनी धर्म व ईश्वर मानलाच आहे. सांस्कृतिक दुराग्रह वा मूलतत्ववाद हे धर्मसंकल्पनेला छेद देणारे आहेत. मानवी भावभावनांचा कार्यकारणभाव मात्र विज्ञानाला देता येत नाही. संगीताने आनंद का व्हावा याचे उत्तर विज्ञानाकडे आजही नाही. अनेकदा वैज्ञानिकांनाही वैज्ञानिक दृष्टिकोन नसतो हे काही अग्रलेखातून सूचित आहे. कोणताही व्यक्तिगत रागलोभ दूर ठेवून त्या त्या ‘फिनॉमिनन’कडे निरपेक्ष बुद्धीने पाहण्यासाठी लागणारे मुक्त मन या सर्व गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनात येतात. विशेष म्हणजे अग्रलेखांची शीर्षके अन्वयार्थक आहेत. उदा. ‘अथांगाचा शोध’, ‘विज्ञानाचा अंत’, ‘इंटरनेटचा विश्वामित्र’, ‘वैज्ञानिकांचे कर्मकांड’, ‘सूर्य आणि जयद्रथ’, ‘युद्ध हतबुद्ध झाला’, ‘खडक आणि लाटा’, ‘विश्वामित्राची प्रतिसृष्टी’, ‘विकास आणि विलास’ इ.इ.

त्यांनी वैज्ञानिकांना ‘विश्वामित्र’ म्हटले आहे आणि वैज्ञानिक घडामोडी, यंत्र, बॉम्ब, इंटरनेट, युद्ध यांना त्या विश्वामित्राचे जग संबोधले आहे. विविध यंत्रे आणि मानव यांच्या परस्पर संबंधाचा वेध घेताना कुमार केतकर स्वतःचीही विचार- प्रतिक्रिया सुसंगतपणे देतात म्हणून या लेखांना ‘ललित’ लेखांचे स्वरूप आले आहे. मानवी प्रज्ञाच विज्ञानाची प्रेरणा आहे. तरीही ‘कोणतेही आर्थिक नियोजन व राजकीय व्यवस्थापन तंत्रज्ञानाशिवाय नाही.’ (पृ.19) तथापि तंत्र माध्यमातून प्रकट होणारी माहिती म्हणजे ज्ञान नव्हे असे ते स्पष्टच म्हणतात. यंत्राच्या आज्ञेमागेही प्रज्ञा आहे. प्रज्ञेच्या जोरावरच वैज्ञानिक कथा-कादंबऱ्या उदयाला आल्या. ‘वायरलेस क्रांतीतून एकविसावे शतक उभे राहणार आहे’ असे ते ‘सत्यशोधाच्या लहरी’ या अग्रलेखात पटवून देतात. माणसाचे आव्हान स्वीकारण्याचे सामर्थ्य त्याला त्याच्या तल्लख बुद्धीने दिल्यामुळे त्याला अफाट सृजनशील कार्य करता येते.

बेकारी, अफाट लोकसंख्या, उद्योग धंद्याचा ऱ्हास अशा अनेक प्रश्नांचा, पर्यायांचा धांडोळा या लेखसंग्रहात आहे. लालित्य, रंजकता, उत्कंठावर्धन, ओघवतेपणा, शैलीची सुलभता, विचारांची स्पष्टता व माहितीची अचूकता आणि त्या लेखांमागील व्यक्ती-समाजहितौषी दृष्टी यामुळे ‘विश्वामित्राचे जग’ वास्तव असून अनुभवजन्य आहे. अशाप्रकारची पुस्तके विज्ञान शाखेतील अभ्यासकांना संदर्भग्रंथ म्हणून बहुमोल ठरतात. कुमार केतकरांचे हे संकलन-संग्रह मात्र कालसापेक्ष मूल्यांमुळे लक्षवेधी ठरणारे आहे एवढे खरेय.

विश्वामित्राचे जग
प्रो. डॉ. शशिकान्त लोखंडे

लेखक : कुमार केतकर
प्रकाशन : नवचैतन्य प्रकाशन
पृष्ठ : 260, मूल्य : रु. 300/-