
सामना ऑनलाईन। लंडन
पंचवीस वर्ष पोटच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी इंग्लडमधील बर्कशायर येथे राहणाऱ्या पीडित मुलाच्या वडिलांना व सावत्र आईला येथील न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मुलगा समलैंगिक असल्याने त्याला अद्दल घडवण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचे या माता पित्यांनी न्यायालयाला सांगितले. सध्या या मुलाचे वय 36 वर्ष असून 11 वर्षाचा असल्यापासून माता पित्यांनी आपला प्रचंड मानसिक व शारीरिक छळ करत आपले लहानपण हिरावले असे या मुलाने निकालानंतर म्हटले आहे.
या मुलाचे वडिल 1990 साली संरक्षण मंत्रालयात काम करत होते. तेव्हापासून ते व त्यांची दुसरी पत्नी मुलाचा लैंगिक छळ करत होते. मुलाने नकार दिल्यास हे दोघे त्याला बेदम मारहाणही करायचे. याला कंटाळून आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही मुलाने न्यायालयाच्या निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच रोज रोजच्या या जाचाला वैतागून मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी झाला. तसेच तो 16 वर्षाचा असताना देखील त्याच्यावर एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले व पुन्हा घरी आणून सोडले. अखेर 2015 साली त्याने न्यायालयात धाव घेत वडिल व सावत्र आई विरोधात खटला दाखल केला. त्याचा निकाल नुकताच लागला असून न्यायालयाने वडीलांना 5 वर्ष आणि सावत्र आईला 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.


























































