
एस.एम.पाटील । परळी वैजनाथ
थकीत वीज बिलासाठी ग्राहकांना तगादा लावणाऱ्या महावितरणचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. परळीत वीज बिल भरलेल्या एकाच क्रमांकाच्या दोन वीज बिल भरणा केलेल्या पावत्या समोर आल्याने त्या दोन्ही ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. वीज बिल भरलेली रक्कमही हजारो रुपयांची असल्याने परळी महावितरण कार्यालयाय नेमके चालले तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे महावितरण कार्यालयात कोट्यवधींचा नवीन घोटाळा समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संतोष मोहन कटारे रा.परळी वैजनाथ यांनी आपल्या विजबिलाची रक्कम रु.25000 त्यांच्या लाइनमनकडे दिली होती. या बद्दल त्यांना त्या लाईनमनने दि.23-10-2018 रोजीची 0827656 या क्र. पावती आणून दिली. मात्र कटारे ही पावती घेऊन महावितरण कार्यालयात दाखविण्यासाठी गेले असता तिथे त्यांना धक्काच बसला. त्यांना जी पावती दिली गेली होती त्याच क्र.पावती म्हणजेच दि.23-10-2018 रोजीचीच 0827656 चक्क दुसऱ्या म्हणजे पी. आर.लटपटे रु 17000 या ग्राहकाची निघाल्याने दोन्ही ग्राहक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांनी याबाबतची तक्रारही महावितरण कार्यालयात केली.
या सर्व प्रकारानंतर परळीच्या महावितरण कार्यालयात नेमकं काय चाललंय दोन वेगळी नाव असलेल्या ग्राहकांना एकाच क्रमांकाच्या पावत्या भेटतातच कशा अशी चर्चा नागरिकांत होऊ लागली आहे. ही चूक आहे की यामागे बोगस पावत्या तयार करून देणार रॅकेटच सक्रिय आहे. परळीच्या महावितरण कार्यालयाबत ग्राहकांच्या नेहमीच मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असतात. मात्र या तक्रारींकडे वरिष्ठ कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नसल्याचे वीज ग्राहकांकडून सांगितले जाते. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराने ग्राहकांना आपण भरलेल्या वीज बिलाची पावतीची शहानिशा थेट महावितरणच्या कार्यालयात जाऊन करण्याची वेळ येणार आहे.
सोमवारी महावितरण बीडचे अधिकारी परळीत
दरम्यान, या सर्व प्रकारावर वरिष्ठ कार्यालयाने लक्ष घातल्याची माहिती सूत्रांकडून भेटली आहे. बीडचे अधिकारी स्वतः परळीत महावितरण कार्यालयात तळ ठोकून असणार आहेत. यामध्ये किती ग्राहकांना बोगस पावत्या दिल्या गेल्या आहेत याची पाहणी ते करणार असल्याचे समजते. एकंदरीतच या सर्व प्रकारामागे नेमके कोण आहे हे समोर येण्याची शक्यता आहे.
महावितरण कार्यालयात वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याची गरज
परळी येथील महावितरणच्या अंदाधुंद कारभारामुळे ग्राहकांना आपल्या वीज बिलात बदल करण्यासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात.काही ग्राहकांना तर वीज बिलच भेट नाही. अशा ग्राहकांना कार्यालयातून वीज बिल घेऊन जावे लागते. मात्र परळीच्या महावितरण कार्यालयातील वीजबिल भरणा केंद्र काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आले आहे. हे केंद्र पुन्हा चालू करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.



























































