
आसावरी जोशी,[email protected]
देशातील पहिले हत्तींचे रुग्णालय. डॉ. यदुराज खडपेकर… पशुवैद्यकतज्ञ. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांतून हे रुग्णालय मथुरेला उभे राहिले आहे. पाहूया याविषयी सविस्तर…
तीतरी पक्षी, प्राणी दिसणं, आपल्या घरात त्यांनी येणं, राहणं आपण शुभ मानतो. इवलीशी चिमणी आता दिसत नाही तर संवेदनशील मन कासावीस होतं. सहज गच्चीत डोकावणारा राघू रंगाप्रमाणेच समृद्धी आणतो. भरजरी पैठणीवरील त्याचे स्थान अढळ. सोन्याच्या पंखांचा भारद्वाज आपल्या दर्शनाने अख्खा दिवसच शुभकारक करतो.
यात प्राणीही कुठे कमी नाहीत. जगदंबेचे वाहन असलेले वाघ, सिंह शौर्याचे प्रतीक, भव्य, धिप्पाड, बुद्धिमान, प्रेमळ गजराज तर थेट घरोघर दहा दिवस मुक्कामीच येतात. ऐसपैस पाहुणचार घेतात, पण मुळात होतं काय ही सारी कोडकौतुकं आपण प्रतीकांपुरती, प्रतिमांपुरती मर्यादित ठेवतो. या प्रतिमांच्या पलीकडे जाऊन आपल्या या ऐश्वर्यसंपन्न प्रतिकांचा या सृष्टीतील एक सजीव म्हणून आपल्यापैकी कितीजण त्यांचा विचार करतात. किंवा जमेत धरतात?
देशातील पहिले रुग्णालय
गजराज… अर्थात हत्ती. केवळ हिंदुस्थानात आणि आफ्रिकेत आढळणारा हा रुबाबदार, देखणा आणि बुद्धिमान प्राणी. देवादिकांच्या सेवेसाठी काही मंदिरात अजूनही हत्ती पाळला जातो. याखेरीज अनेक बेकायदेशीर मार्गांनी या गुणी, देखण्या, सोशिक प्राण्याचा गैरफायदा घेतला जातो. पण आपल्या समाजात जशा अनिष्ट वृत्ती आहेत तशीच काही चांगली संवेदनशील मनंही आहेत. डॉ. यदुराज खडपेकर. पशुवैद्यक तज्ञ. ‘वाइल्डलाइफ एसओएस’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशातले पहिले हत्तींसाठी रुग्णालय मथुरेत सुरू केले आहे. आपल्याकडे मुळातच प्राण्यांसाठी सुसज्ज असणारी रुग्णालये अगदी पुणे-मुंबईसारख्या शहरांतही कमीच आहेत असे म्हणायला हरकत नाही. या पार्श्वभूमीवर केवळ हत्तींसाठी रुग्णालय ही वेगळी संकल्पना डॉ. खडपेकरांनी प्रत्यक्षात आणली आहे.
याबाबत बोलताना डॉ. खडपेकर म्हणाले की, हत्ती हा सहज व चटकन माणसाळणारा प्राणी असला तरी अरण्य हे त्याचे खरे वसतिस्थान. तो काही पाळीव प्राणी नाही. पण हे अर्थातच माणसांना समजत असलं तरी वळत नाही. त्यामुळे त्याच्या दातांची तस्करी, लाकडी ओंडके उचलण्यासाठी त्याच्या शक्तीचा गैरवापर, पुणे-मुंबईसारख्या शहरांतून जरी आता हत्ती फिरवण्यास बंदी असली तरी महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेशात अजूनही सर्रास रस्त्यांवरून हत्ती फिरवतात. याचा हत्तींना सर्वाधिक त्रास होतो. वजन जास्त असल्यामुळे अगदी तरुण हत्तींनादेखील संधीविकाराचा त्रास असतो. त्यांच्या पावलांची रचना डांबरी रस्त्यावर चालण्यायोग्य अजिबातच नसते. त्यामुळे हत्तींना पायाचे विकार उद्भवतात. शिवाय पायात साखळदंड हवे तसे, चुकीच्या पद्धतीने बांधले गेल्याने पायावर सतत जखमा होतात. त्यावर औषधोपचार न केले गेल्याने त्या खोलवर पसरतात व बऱया होत नाहीत. अशा हत्तींना आम्ही आमच्या ताब्यात घेतो. त्यांना बरे करतो. शक्य झाल्यास त्यांना अरण्यात सोडून देतो किंवा आम्ही त्यांचा सांभाळ करतो.
औषधोपचार आणि शस्त्रक्रिया
हत्तींवर औषधोपचार किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रिया किंवा शस्त्रक्रियेसाठी हलवणे हा एक खूप मोठा कारभार असतो. सर्वसाधारण प्राण्यांच्या रुग्णालयात त्या करणं अवघड असतं. किंबहुना तशी साधनसामुग्रीही उपलब्ध नसते. यातूनच अशा प्रकारचं रुग्णालय उभं करण्यासाठी आम्ही ‘वाइल्डलाइफ एसओएस’ या प्राणीप्रेमी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. गेल्या वर्षभरापासून आमचे प्रयत्न सुरू आहेत. येथे रस्त्यावर फिरवण्यात येणारे हत्ती, सर्कशीतले हत्ती आम्ही ताब्यात घेतो. 18 नोव्हेंबरला या रुग्णालयाचे उद्घाटन झाले. आजमितीला आमच्याकडे 20 हत्ती उपचार घेत आहेत.
पाण्यातील उपचारपद्धती
डॉ. यदुराज म्हणाले की, विविध अत्याधुनिक उपकरणांनी आमचं रुग्णालय सुसज्ज आहे. हत्तीच्या विविध चाचण्यांसाठी प्रयोगशाळा आहेत. वायरलेस डिजिटल एक्स-रे, लेझर ट्रिटमेंट, डेंटल एक्स-रे, थर्मल इमेजिंग, अल्ट्रासोनोग्राफी, अल्ट्रासाऊंड मशीन, लेझर थेरपी, पॅथ लॅब, पायांवरील उपचारांची उपकरणं, तसेच जायबंदी हत्तींना उपचारासाठी आणायला विशिष्ट क्रेनची व्यवस्था आहे. हत्तींसाठी विशेष हायड्रो थेरपीची व्यवस्था केली आहे. हत्तींचे पाय जेवढे मजबूत तितकेच नाजूक असतात. त्यासाठी ही पाण्यातील उपचारपद्धती सुरू केली आहे. ही संधीवातावर विशेष गुणकारी आहे. हत्तीला पाण्यात डुंबायला खूप आवडते. तशी व्यवस्था रुग्णालयात आहे. त्याच्या शरीराचे तापमान संतुलीत ठेवण्यासाठी रुग्णवाहिकेत पाण्याचे फवारे बसविले आहेत.
हत्तींचे समुपदेशन
या रुग्णालयाव्यतिरिक्त येथे हत्तींचे संवर्धन केंद्रही आहे. येथे जेव्हा हत्ती येतो तेव्हा बऱयाचदा मानसिकदृष्टय़ा ते बिचकलेले असतात. त्याचा जेव्हा माहुत बदलला जातो तेव्हा दुसऱया माहुताशी पुन्हा नव्याने जुळवून घेणं त्याला अवघड जातं. अगदी सुरुवातीला चंपा ही हत्तीण होती. तिचा माहुत 27 वेळा बदलला गेला. आणि या माहुतांकडून बऱयाचदा हत्ती ऐकत नसला की शिक्षा केली जाते. अंकुश टोचणं, उपाशी ठेवणं यातून हत्तींचा स्वभाव चिडचिडा होता. म्हणून येथे आम्ही त्यांना सकारात्मक वातावरण देतो. त्यांनी छोटीशी गोष्ट जरी ऐकली तरी त्यांना बक्षीस देतो. उदा. खजूर, केळं किंवा त्यांचा आवडीचा पदार्थ ऊस. यामुळे हत्ती सकारात्मक आनंदी राहण्यास मदत होते.
माणसांच्या चुकीचे परिणाम
बऱयाचदा जत्रेतून, सर्कशीतून हत्तींना खूपच चुकीचा आहार दिला जातो. वडापाव, अतिरिक्त गोड असलेले पदार्थ. हे असं चुकीचं खाणं हत्तींना मानवत नाही. तो मुळात फळं, थोडय़ा फार भाज्या, पानं खाणारा प्राणी आहे. पण माणसं त्याच विचारच करीत नाहीत. देवाचा प्रसाद म्हणून त्याला गोड पदार्थ खायला घालणं तर सर्रास होतं. एका हत्तीने 300 वडापाव खाल्लेले आहेत. माणसांच्या या चुकीचे परिणाम मात्र त्या मुक्या जिवांना भोगावे लागतात.
येथे डॉ. यदुराज यांनी सांगितले की, माणसाच्या अनाठायी धार्मिक गरजा भागविण्यासाठी हत्तींना खरोखर प्रचंड दिव्यातून जावे लागते. अगदी लहानपणीच छोटय़ा पिलाला आईपासून तोडले जाते. त्याचा त्या आई व पिलावर मानसिक परिणाम होतो. हत्ती अतिशय कुटुंबवत्सल प्राणी आहे. ते नेहमी त्यांच्या कळपाला, कुटुंबाला धरून असतात. माणसं मात्र स्वतःच्या हौसेखातर त्यांना एकटं पाडतात. त्याच्याइतका सोशिक प्राणी शोधूनही सापडणार नाही. पण या धार्मिक गरजांसाठी त्यांना वेठीला धरण्याऐवजी त्यांच्यातच देव शोधला तर बऱयाच गोष्टी सोप्या होतील.
महाराष्ट्रातही प्राण्यांसाठी काम करण्याची तळमळ
डॉ. यदुराज यांच्याशी बोलताना त्यांची तळमळ लक्षात येत होती. महाराष्ट्रातही त्यांना हत्तींसाठी काम करण्याची इच्छा आहे. फक्त त्यासाठी शासकीय इच्छाशक्तीची गरज आहे. हत्तींचा किंवा इतर प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास अर्थात अरण्य ही त्यांची घरं आहेत. येथे माणूस मात्र त्यांच्या घरावर अतिक्रमण करीतच चाललाय. या साऱयाचा परिणाम प्राण्यांच्या मानसिक संतुलनावर होतो. मौजमजेसाठी शिकारी, प्राण्यांना मारणं, त्रास देणं, त्यांची तस्करी करणं यातून आपण माणसंच स्वतःचं नुकसान करून घेतोय. आज एक रुग्णालय उभं करून आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय. महाराष्ट्रातही यायचं आहे. पाहुया कसं होतं ते…
आपल्यापैकी कितीजण असा विचार करतात? प्राणी, पक्ष्यांना आपण देवत्त्व दिले आहे, पण देवासारखी वागणूक देतो का? का फक्त स्वतःच्या सोयीसाठी त्यांचा वापर करून घेतो. खरोखरच आता हा विचार युद्धपातळीवर करण्याची वेळ आली आहे. कारण आपल्याकडे फक्त 15 टक्के अरण्ये संपूर्ण देशात शिल्लक राहिली आहेत. त्यावरही ‘माझं की तुझं’ करून अतिक्रमणं सुरूच आहेत. बफरझोनमधील शेती, स्वतःच्या अवास्तव गरजा पूर्ण करण्यासाठी अरण्यं म्हणजे स्वतःची वडिलोपार्जीत संपत्ती असल्यासारखा माणसाचा वावर हे सारं कुठेतरी थांबायला हवं. शासकीय इच्छाशक्ती आवश्यक असली तरी आपण माणसांनीच आता सूज्ञ होण्याची गरज आहे.
काही माहीत नसलेल्या गोष्टी
हिंदुस्थानी हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठमोठे सुळे असतात. मादीला सुळे नसतात.
हत्ती जंगलात कळपाने राहतात. कळपाचे नेतृत्त्व ज्येष्ठ, अनुभवी मादीकडे असतं.
हत्तीण साधारण दर 5 ते 8 वर्षांनी एकाच पिल्लाला जन्म देते. गर्भावस्थेचा काळ 22 महिन्यांचा असतो. जन्मतःच बाळाचे वजन 50 ते 100 किलो असतं.
बाळ 15 वर्षांचं होईपर्यंत आई त्याची काळजी घेते.
हिंदुस्थानी हत्तींची उंची असते 10 फूट आणि वजन 5000 किलो.
हत्तींच्या सुळ्यांचा उपयोग स्वसंरक्षणासाठी, झाडांच्या साली ओरबाडण्यासाठी, खुणा करण्यासाठी होतो.
हत्ती सोंडेला खूप जपतात. मारामारी करताना सोंड गुंडाळून घेतात. कारण तिला इजा होऊ द्यायची नसते.
एक मोठा हत्ती दिवसभरात 300 किलो खाणं खातो… आणि 60 गॅलन्स पाणी पितो. पण खाण्याच्या बाबतीत ते खूप चोखंदळ असतात.
हत्ती ताशी 4 कि.मी. चालतो. खूप जोरात धावू शकतात.
केवळ ध्वनीच्या माध्यमातून हत्ती आपल्या कळपाशी व इतर प्राण्यांशी संपर्क साधू शकतो.
माणूस हा हत्तीचा एकमेव शत्रू.

























































