
सामना प्रतिनिधी । भिगवण
सरकारने दूध भेसळ कायदा मंजूर केला असून जर कोणी दुधात भेसळ करताना आढळला तर त्याला चक्की पिसिंग अँन्ड पिसिंग करावे लागेल, यासाठी आताच सांगतो परत म्हणू नका दादांनी सांगितले नाही, असे सांगत दूधात भेसळ करू नका असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. दूध भेसळ रोखण्यासाठी कायदा मंजूर झाला असून त्या गुन्ह्यासाठी जन्मठेप होणार आहे, असे भिगवण येथील एका खासगी कार्यक्रमात त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दुधासाठी पाच रुपये जास्त मिळणार असून आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला पाच रुपये मिळतील पण त्यासाठी दुधात भेसळ करू नका,भेसळ केल्यास खडी फोडायला जावे लागले. भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा केला असून या गुन्ह्यासाठी जन्मठेप होणार आहे. त्याला जामीन नाही.म्हणून सांगतो असा गुन्हा करू नका आणि जर कोणी करत असेल तर त्याला रोखा. असे गुन्हे करणारा कोणत्याही पक्षाचा नसतो किवा कोणाचाही कार्यकर्ता नसतो. पुढील सहा महिने 1972 पेक्षा वाईट आहेत. त्यासाठी येणाऱ्या काळात आपला संसार नीटनेटका करा. कारण नसताना पुण्यामुंबईचे दौरे करू नका. उजनी धरण आताच 50 टक्क्यांवर आले आहे. उद्या पाण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, पण त्यासाठी आपणही रस्त्यावर उतरले पाहिजे. नाही तर तुम लढो हम कपडे संभालते हैं अशी अवस्था व्हायला नको. या सरकारला फक्त आंदोलनाचीच भाषा समजते. मराठा समाजाने शांततेत 58 मोर्चे काढले. त्यात 42 जणांचे बळी गेले. त्यानंतर सरकार जागे झाले आणि आरक्षण दिले. म्हणून सांगतो की वेळ पडल्यास आपल्याला रस्त्यावर उतरून या सरकारला जागे करावे लागेल, असेही पवार यांनी सांगितले.
सध्याचे सरकार जातीयवादी असून शेतकरीविरोधी आहे. कर्जमाफी किती मिळाली हे त्यांना सांगता येत नाही. राज्यात पूर्णवेळ कृषीमंत्री नाही. दिशाभूल करून रेटून बोल अन खोटे बोल असे सरकारचे काम सुरू आहे. सरकार म्हणते की शेतकरी टॅक्स भरत नाही,हे साफ खोटे आहे,शेतकरी साखर,बगॅस,मोलॅशिस अशा विविध स्वरूपातून सरकारला एका टनासाठी जवळपास 400 रुपये कर भरतो. आपल्या हक्कासाठी आपल्याला हे सर्व करावे लागेल. जीएसटी, कर्जमुक्ती, इंधन दरवाढ आदी अनेक मुद्द्यांवर त्यांनी सरकारवर चौफेर टीका केली. या कार्यक्रमाला आमदार दत्तात्रय भरणे ,आरोग्य सभापती प्रवीण माने,प्रदीप गारटकर महारुद्र पाटील,जि. प. सदस्य हनुमंत बंडगर,नानासाहेब बंडगर आदीसह तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनगर समाजाला आरक्षण कधी?
बारामतीत उपोषणाला बसलेल्या धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देवू म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडायला लावले होते. त्यांना आरक्षण देणार कधी असा सवाल पवार यांनी यावेळी केला. सरकार समाजाच्या भावनेशी खेळत असून क्या हुआ तेरा वादा असे त्यांनी सरकारला विचारले.


























































