दिव्यागांना बळ देऊन त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासन दरबारी आवाज उठवू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त गांधी चौकात  विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. दिव्यांग माणसाला अनंत शारिरिक, मानसिक व आर्थिक अडचणीचा सामना दैनंदिन जीवनात करावा लागतो. त्यांना आधार देणे हे शासन व प्रशासनाचे कर्तव्य असून केवळ कागदावरच नियम न बनवता दिव्यांगाच्या हक्‍कासाठी तरतूद केलेला निधी, नियम, सर्व बाबी, सुख-सुविधाची अमलबजावनी काटेकोरपणे होण्याची नितांत गरज असून आजची महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तुटपुंज्या मानधनावर गुजरान करणे, या बांधवांना मोठी कसरत करावी लागले. त्यामुळे शासकीय नोकरीचा अनुशेष त्वरीत भरावा तसेच त्यांच्या मानधात कमालीचा वाढ व्हावी, अशी व इतर प्रश्‍न न्याय हक्‍काच्या मागण्यांसाठी आपण शासन दरबारी निश्‍चित आवाज उठवू व मानवतेच्या दृष्टिकोणातून मदतीसाठी पुढे येऊ, असे आश्‍वासन  माजी आमदार कव्हेकर यांनी दिले.

नुकतेच राज्याचे समाजकल्याण मंत्र्यांनी दिव्यांगाना शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य विकास या विभागात 5 टक्के राखीव निधी ठेवल्याचे घोषित केलेले असून त्याची अंमलबजावणी तत्काळ होणे गरजेचे आहे. उच्चशिक्षणात व रोजगारात नव्याने संधी मिळावी तसेच 14 व्या वित्त आयोगातून प्रत्येक ग्रामपंचायतीला गावात 5 टक्के निधी खर्च करण्याचा आदेश द्यावेत. तसा नियम नगरपालिका व महानगरपालिकेला लागू करावा, त्यांना व्यवसायासाठी जागा मिळवून द्यावी. मासिक मानधनात वाढ व्हावी, रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या वतीने विनाअट कर्ज देण्याची व्यवस्था करावी, त्याचबरोबर माणसुकीचा दृष्टिकोण ठेवून लग्नासाठी अनुदान देण्यात यावे. या व इतर सर्व मागण्याला आपला पाठींबा असून दिव्यांगाच्या सर्वांगीण विकास व हिताच्या मागण्या आपण शासन दरबारी मांडून त्या मंजूर करून घेण्यासाठी निश्‍चित प्रयत्न करू.  सर्व दिव्यांग बांधवाने  धीराने व ताकतीने जीवन जगावे सर्वांच्या मदतीसाठी पाठबळासाठी आपण खंबीरपणे सोबत आहोत, असा आशावादही शेवटी बोलताना व्यक्‍त केला.

यावेळी दिव्यांग संघटनेचे जिल्हा पदाधिकारी, निनीन देशमुख, उध्दव जाधव, बाळासाहेब जाधव, रोहिती पांचाळ आदींसह जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग महिला-पुरूष, युवक उपस्थित होते.