पाण्याची बिले पोस्टाने येणार,टपाल खात्याला 3.55 कोटी देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

शहर व उपनगरातील नागरिकांना पाण्याची बिले पोस्टाने घरपोच करण्यात येणार आहेत. दर दिवसाला 5000 बिलांचे वितरण पोस्टामार्फत करण्यात येणार असून पाच वर्षांसाठी हिंदुस्थानी टपाल खात्याशी करार करण्यात येणार आहे.

मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटी असून संपूर्ण मुंबईला महापालिका पाणीपुरवठा करीत असते.  महापालिका मुंबईकरांना दररोज 3750 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करते. या पाणीवापराची बिले दर महिन्याला किंवा दर तीन महिन्यांनी बनवली जातात. दर दिवशी सुमारे 5000 बिले संगणकीय पद्धतीने बनवली जातात. पाण्याच्या बिलांच्या वसुलीतून पालिकेला महसूल मिळत असतो. त्यामुळे छपाई आणि वितरणाचे काम अव्याहतपणे सुरू असते. बिलांच्या छपाईचे कंत्राट देण्यात आलेले असून त्यानंतर वितरण व्यवस्था हिंदुस्थानी टपाल खात्यामार्फत करण्यात येणार आहे. याबाबत टपाल विभागाने प्रस्ताव पालिकेकडे पाठवला असून त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव आता सभागृहाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

  •  पालिका हद्दीत एकूण जलजोडण्या-4.12 लाख
  •  पाण्याची एकूण बिले-90 लाख

टपाल खाते पालिकेकडून बिल मेल सर्व्हिस सेवा दर म्हणून प्रत्येक बिलामागे 3 रुपये, फ्रँकिंग चार्जेस 40 पैसे, विशेष हँडलिंग चार्जेस म्हणून 30 पैसे व पिनकोडनुसार वर्गीकरणासाठीच्या आकारापोटी 10 पैसे असे एकूण 3.80 रुपये प्रति पाणी बिल असे दर आकारणार आहे. 60 महिन्यांसाठी टपाल खाते 90 लाख पाणी बिलासाठी एकूण 3 कोटी 55 लाख रुपये घेणार आहे.