
सामना प्रतिनिधी । लातूर
खटल्याची तारीख वाढवून देण्यासाठी २ हजार ५०० रुपयांची लाच सहाय्यक सरकारी वकील अनुराधा शिवाजी झांपले यांनी स्विकारली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह त्यांना रंगेहात पकडले.
तक्रारदारांच्या विरोधात चालू असलेल्या खटल्यात पुढील तारीख वाढवण्यासाठी सहाय्यक सरकारी वकील अनुराधा शिवाजी झांपले यांनी २५०० रुपयांची लाच मागीतली होती. त्यासाठी त्यांनी सरकारी वकील कार्यालयातच लाचेची रक्कम स्विकारली आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. उपअधिक्षक माणिक बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा यशस्वी करण्यात आला. पोलीस निरीक्षक कुमार दराडे, वर्षा दंडिमे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक वर्षा दंडिमे ह्या करीत आहेत.





























































