
>> शुभांगी बागडे
कुपोषण ही केवळ राज्यातील काही ठिकाणीच आढळणारी समस्या म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो; परंतु झपाट्याने वाढणाऱ्या महानगरांतही या समस्येने मूळ धरले आहे. रूढ कुपोषणाबरोबरच चुकीच्या आहारामुळे होणारे कुपोषणाचे प्रमाण शहरी भागातही झपाट्याने वाढते आहे.
वय आणि श्रमाच्या मानाने योग्य आहार मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे, पण हा हक्क प्रत्यक्षात उतरत नाही. हिंदुस्थानसारख्या देशांत निदान निम्मा समाज दारिद्रय़रेषेखाली राहतो. कुपोषण हे या समाजाचे अंग बनलेले आहे. उरलेल्या समाजातील काही टक्के लोकांना अतिपोषणामुळे येणारे आजार जडतात. कुपोषण म्हणजे पोषणाची कमतरता किंवा अतिरेक. आपल्या देशाच्या संदर्भात कुपोषण म्हणजे बहुतांश अन्नाची कमतरता हाच अर्थ घेतला जातो. कुपोषणाचे (कमतरता) दोन प्रकार आणखी सांगता येतील. एक म्हणजे विशिष्ट अन्नघटकांची उणीव (उदा. ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव) आणि दुसरा म्हणजे सर्वच प्रकारचे अन्न कमी पडणे. या दोन्ही प्रकारचे कुपोषण दारिद्रय़रेषेखाली मोठया प्रमाणात दिसते, पण त्यातल्या त्यात आहार कमी पडणे हाच प्रकार मुख्य आणि महत्त्वाचा आहे. अन्न कमी पडल्यामुळे होणारे कुपोषण हे केवळ ग्रामीण भागातच असून शहरी भाग त्यापासून दूर असल्याचे गृहितक समाजात तयार झाले आहे. वर्षानुवर्षे ठरावीक क्षेत्रांमध्ये कुपोषण होत असल्याचे आपण ऐकत असल्याने महानगरांतील कुपोषणाकडे साहजिकच दुर्लक्ष होते.
मुंबईसारख्या सर्वंकष विकासात कायम पुढे असणाऱ्या शहराने कुपोषणातही आघाडी घेतली आहे. मुंबईत सर्व स्तरांतील समाज राहतो. या शहराची संपन्नता त्या त्या विभागानुसार लक्षात यावी इतका इथे आर्थिक स्तरातील फरक दिसून येतो. मुंबईतील काही दुर्लक्षित भागातील बालकं कुपोषित गटात ठळकपणे अधोरेखित होतात. डम्पिंग ग्राउंडच्या आसपास ’कचरा वेचणारी’, रस्ते वा इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी आईवडिलांसोबत येणारी मुलं, रोजंदारीसाठी फिरणारी मुलं, ट्रेनमध्ये छोटय़ा छोटय़ा वस्तू विकून गुजराण करणारी मुलं यांच्या भुकेल्या नजरा अद्यापही दुर्लक्षितच आहेत. अत्यंत गरीब, हलाखीच्या परिस्थितीत कुठेही दिकस काढणाऱ्या या मुलांना ना पोषण मिळते ना सरकारी योजनेचा लाभ मिळतो.
कुपोषणाच्या प्रश्नाला जितक्या आर्थिक व शासकीय बाजू आहेत तितक्याच सामाजिक व सांस्कृतिक बाजूदेखील आहेत. आपला पुरुषप्रधान समाज अजूनही स्त्रिया वा मुलांच्या आरोग्याबाबत तितका सजग नाही. विशेषतः आर्थिक स्तर जितका निम्न तितकीही समज कमी दिसून येते. शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, आहाराबद्दल फारशी जागरूकता नसणं या सगळ्याचा परिणाम आज कुपोषणाच्या प्रश्नावर होताना दिसतो आहे. आलेल्या दिवसाची गुजराण करण्याइतकंही उत्पन्न नसतं अशा घरांत जे तुटपुंजे आहे त्यात आधी पुरुष जेवतो, मग मुलगा आणि मग घरातील लेकरीबाळी. खरं तर स्त्रिया काही कमी राबत नाहीत. अशा कुटुंबांत तर उत्पन्नाची मदार बहुतांशी स्त्रीवरच असते. या स्त्रिया अविश्रांत काम करतात. मात्र पुरुष ‘कर्ता’ असतो या पुरुषप्रधान समाजाने लादलेल्या समजुतीत घरची स्त्री, मुलगी उरलेले वा शिळेपाके खाते किंवा उपाशी झोपते. या स्त्रिया व मुलांचे हाल समानच असतात. यातून उद्भवणारे अनेक प्रकारचे आजार अगदी घरोघरी दिसतात. यामुळेच एखादी आजाराची साथ वा आर्थिक संकट आल्यास कुपोषणाला बळी पडणं आपसूक घडतं. कुपोषणाची ही सीमारेषेवर साधारण 5 वर्षांखालील मुलं जास्त आढळतात. मुंबईतल्या अनेक अभ्यासांत, शहरातील विविध वस्त्यांत कुपोषित बालकांचा आकडा दिसून येतोच.
हे चित्र पाहता या प्रश्नाची तीव्रता जशी ग्रामीण भागात, दुर्गम आदिवासी भागात आहे तशीच शहरांमध्येही आहे हे पटतं. कुपोषणाच्या प्रश्नावर आज वेगवेगळय़ा स्वयंसेवी संस्था काम करत आहेत. सरकारी प्रयत्न सुरू आहेत. झोपडपट्टी-वस्त्यांमध्ये होणारी कुपोषणाची कारणे स्पष्ट आहेत. तुटपुंजे उत्पन्न आणि महागाई यामुळे या ठिकाणी संतुलित आहार मिळणे अवघड असते. संतुलित व पोषक आहाराच्या सवयींद्वारेच कुपोषित मुलांच्या शारीरिक वाढीचं संतुलन योग्य राखणं शक्य आहे आणि हे शक्य होण्यासाठी मुंबईत अनेक स्वयंसेवी संस्था या समस्येचा पाठपुरावा करीत आहेत. मुंबईतील ‘स्नेहा’ ही स्वयंसेवी संस्था झोपडपट्टीतील मुलांच्या पोषणासाठी अथक काम करत आहे. ‘स्नेहा’ म्हणजे सोसायटी फॉर न्यूट्रिशन, एज्युकेशन अॅण्ड हेल्थ. शिक्षण, आरोग्य या प्रश्नांइतकीच या संस्थेने मुंबईसारख्या शहरांमध्ये आढळणाऱ्या मुलांच्या कुपोषणाचीही दखल घेतली आहे. मुंबईतील झोपडपट्टय़ा म्हणजे देशभरातून येणाऱ्या लोंढय़ांचं आश्रयस्थान. या गरीब वस्त्यांमधून राहणारी मुलं कुपोषणाचे बळी ठरतात. या वस्त्यांतील 0 ते 3 या वयोगटांतील मुलांसाठी स्नेहा संस्था ‘आहार’ नावाचा उपक्रम राबवते. यात गर्भातील बाळाच्या आरोग्याची व आहाराची काळजी याचाही समावेश आहे.
याबाबत संस्थेच्या प्रकल्प संचालक सुषमा शेंडे सांगतात की, धारावीतील अंगणवाडय़ांमध्ये येणारी मुलं आणि त्यांच्या माता, गर्भवती स्त्रिया यांच्यासाठी 2011 ते 2016 मध्ये काम करत असताना वेगवेगळय़ा माध्यमांद्वारे प्रयत्न करण्यात आले. साधारण 300 अंगणवाडय़ांबरोबर 4 टप्प्यांमध्ये हे काम करताना यात प्रत्येक अंगणवाडीत 16 ते 18 महिने हे काम करण्यात आले. तेथील स्थानिक शासकीय आरोग्य यंत्रणा आणि समाजगट यांच्यात समन्वय साधत हे काम करण्यात आलं. विशेषतः या उपक्रमांमध्ये अंगणवाडी सेविकांना सहभागी करून घेण्यात आले. ज्यात गरोदर माता व मुलांची तपासणी, त्यांची काळजी यावर भर दिला गेला. या कामासाठी संस्थेद्वारे मोबाइलवर आधारित यंत्रणा राबवण्यात आली. या कामाबाबत अधिक माहिती देताना संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प संचालक अनघा वायंगणकर सांगतात की, या कामामुळे कुपोषणाबरोबरच तिथल्या इतर सेवांमध्येही चांगला बदल दिसून आला. सध्या संस्थेबरोबर अंगणवाडय़ांसह 700 स्वयंसेवक वस्तीतीतील मुलांच्या आरोग्यासाठी काम करत आहेत. स्वयंसेवकांचे हें काम विनामूल्य तत्वावर केले जाते आणि यासाठी संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाते. संस्थेच्या उपक्रमांत आयसीडीएस प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी संस्थेला प्रत्येक स्तरावर चांगल्या प्रकारे सहयोग देतात.
कुपोषित बालकांसाठीचा संस्थेचा ‘आहार’ उपक्रम लाभदायक आहे. धारावी येथे प्रथम हा उपक्रम सुरू करण्यात आला. यात बाळाला स्तनपान कधी व कसे करावे, सकस आणि संतुलित आहार मिळेल याबाबत चित्रदर्शक कार्डाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. या उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त बालकांपर्यंत पोहोचता आल्याने मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. संस्थेच्या ‘आहार’ या उपक्रमात मुलांच्या पालकांना कुपोषण म्हणजे काय हे नेमकेपणाने समजावून सांगण्यासाठी त्यांचे वर्ग घेतले जातात. घरातील उपलब्ध अन्नपर्यायांपैकी मुलांचे वजन वाढवण्यासाठी नेमके कोणते अन्नघटक द्यायला हवेत याविषयीही माहिती दिली जाते.
महानगरी कुपोषणाचा विळखा कमी करण्यात अनेक संस्था हातभार लावत आहेतच; मात्र सरकारी पातळीकर प्रश्नाच्या मुळापर्यंत पोहोचून मुलांना पोषक आहार उपलब्ध करून देणं जास्त गरजेचं आहे.


























































