
सामना प्रतिनिधी । कवठे येमाई
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगर माथ्यावरील मिडगुलवाडी, फलकेवाडी, गारकोल्हे, ढगेवाडी व वाड्यावस्त्यांवर दुष्काळाची तीव्रता डिसेंबरच्या सुरुवातीसच भयानक वाढली असून माणसांना पाणी पिण्यासाठी टँकर जरी चालू झाले असले तरी जनावरांना पाणी द्यायचे कोठून? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे. जनावरे जगविण्यासाठी जनावरांना “कोणी पाणी देता का पाणी?” असे म्हणत वणवण फिरण्याची पाळी मिडगुलवाडी व परिसरातील शेतकऱ्यांवर आताच आली आहे.
पावसाळा अजून कोसो दूर असताना मिडगुलवाडी परिसरात दुष्काळाने रुद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. मिडगुलवाडी परिसरातील शेतक-यांकडे जीवापाड जपलेली अनेक जनावरे आहेत. या वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने परिसरातील विहिरी, नाले, तलाव कोरडे ठाक पडले आहेत. शेते उजाड झाली आहेत. अशा परिस्थितीत शेळ्या, गाई, वासरे व इतर जनावरांना जगविण्यासाठी आमच्या जनावरांसाठी कोणी पाणी देता का पाणी? असे म्हणण्याची व पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. मिडगुलवाडीतील शेतकरी ज्ञानू मिडगुळे व हनुमंत मिडगुले या दोघा भावांकडे ५० च्या पुढे गायी वासरे, बैल, म्हशी, शेळ्या अशी जनावरे आहेत. दुष्काळी संकटामुळे १०-१२ गाया पाहुण्यांकडे सोडल्या असल्या तरी उर्वरित जनावरांना जगविण्यासाठी दिवसाआड एक ट्रॅक्टरभर चारा कवठे येमाई व परिसरातून आणावाचं लागत आहे. तर एक पाण्याचा टँकर डिंबा उजवा कालवा किंवा ओळखीच्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरून भरून आणावा लागत आहे. मागील ४ महिन्यापासून या सर्व जनावरांसाठी दिवसाकाठी सुमारे २ हजार खर्च त्यांना करावा लागत आहे. खाटकाची धन होण्या ऐवजी पाव्हण्यांकडून उसनेपासने करून दारातील ही लक्ष्मी जागविण्याचा शेतकऱ्यांना जीवाचे रान करावे लागत आहे. सध्या सुरु असलेल्या पाण्याच्या टँकरमधून माणसांना पाणी पिण्यासाठी केवळ एक ड्रम भरून मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर सरपंच गणेश मिडगुले व माजी सरपंच सुनील मिडगुले यांनी वाडीतील लोकसंख्या विचारात घेता पाण्याच्या टँकरच्या खेपा तातडीने वाढविण्याची गरज व्यक्त केली आहे.
तहसीलदार अथवा संबंधित जबाबदार शासकीय अधिका-यांनी चारा नाही तर निदान आमच्या जनावरांसाठी तरी तातडीने पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आत्महत्या करावी लागेल, असा भावनिक इशारा ज्ञानू ठका मिडगुले या शेतक-याने ग्रामस्थांसमोर उद्वेगाने बोलताना दिला आहे.
जनावरांच्या पाणी समस्ये बाबत शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांच्याशी संपर्क केला असता मिडगुलवाडी येथील जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता व्हावी याकामी ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आल्यास तो तातडीने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल.तेथून आदेश मिळताच लगेचच जणावरांसाठी पाणी टँकर उपलब्ध करण्यात येतील असे सांगितले.
तर आता शिरूरच्या पश्चिम भागातील तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत असलेल्या मिडगुलवाडी व परिसरातील गावे वाड्यावस्त्यातील नागरिकांना पिण्यासाठी व जनावरे जगविण्यासाठी प्रशासनाने नियमात शिथिलता आणून तातडीने टँकरद्वारे पाणी उपलब्ध करण्याची गरज या भागातील शेतकरी व नागरिकांमधून होत आहे.































































