बालकस्नेही कोर्टरूमचे काम आजपासून सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

सामना ऑनलाईन

लहान फिर्यादी मुले आणि साक्षीदार यांना एखाद्या गुह्याबद्दल माहिती देताना अवघडल्यासारखे वाटू नये म्हणून सरकार राज्यभरात बालकस्नेही कोर्टरूम उभारणार असून त्यासाठी 82 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे विशेष कोर्टरूम उभारण्याचे काम बुधवारपासून सुरू होणार आहे तसेच दक्षिण मुंबईतील सत्र न्यायालय आणि दिंडोशी येथे ही कोर्टरूम उभारण्यात येणार आहे,अशी माहिती आज राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली. ‘पोक्सो’ कायदा, बालविवाहाविरोधातील कायदा तसेच बाल न्यायालयांमध्ये विविध कायदे पाळले जात आहेत की नाही त्याकडे लक्ष देण्याचे आदेश फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने देशातील प्रत्येक उच्च न्यायालयांना दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने ‘स्युमोटो’ याचिका दाखल करून घेतली. आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टाला सांगितले की, शहरात बालकस्नेही कोर्टरूम स्थापन करण्यासाठी 82 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे कोर्टरूम प्रत्येक जिह्यात उभारण्यात येणार आहेत. तसेच बालकस्नेही कोर्टरूमचे काम महिनाभरात पूर्ण होणार आहे.