
सामना प्रतिनिधी । मुंबई
संगीत, नाटय़, नृत्य, चित्रपट, साहित्य… अशा विविध कलांचा आस्वाद रसिकांना आता लवकरच घेता येणार आहे. निमित्त आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील ‘चतुरंग रंगसंमेलना’चे. अनेकविध कलारंगांची रेलचेल असणारे यंदाचे हे 28वे रंगसंमेलन 15 आणि 16 डिसेंबर रोजी रवींद्र नाटय़मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. दोन्ही दिवस दुपारी 3 ते रात्री 10.30 या वेळेत हे संमेलन रंगेल.
सर्वच वयोगटांतील रसिकांना हवेहवेसे वाटणारे हे रंगसंमेलन यंदा प्रथम बंदिस्त सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसांत भरत बलवल्ली यांचे गायन, नकुल घाणेकर यांचे नृत्य सादरीकरण, पं. भवानी शंकर, पं. मुकुंदराज देव, शंकर नारायण, जयेश कथक यांचा पखवाज, तबला, मृदुंगम आणि जेंबे असा तालवाद्यांचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱया दिवशी ‘रंगरेषांचे राजे महाराजे’ हा संपादक रामदास फुटाणे यांचा प्रात्यक्षिकांसह मुलाखतीचा कार्यक्रम आणि ‘नाटय़ संमेलनाची नवी वहिवाट’ हा नाटय़कर्मींचा कार्यक्रम होईल.
‘जीवनगौरव’ पुरस्कार
1991 पासून चतुरंगतर्फे प्रतिवर्षी सांस्कृतिक, समाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱया व्यक्तीस ‘जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार जागतिक कीर्तीचे चित्रकार सुहास बहुळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवारी 6.30 वाजता प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल, ‘कलावंत आणि माणूस’, ‘आयुष्याची मौल्यवान माती’, ‘दृश्यकलेवरील 6 खंड’ अशा चित्रकलाविषयक पुस्तकांची निर्मिती करून बहुळकरांनी मोलाचे योगदान दिले आहे, अशी माहिती चतुरंगतर्फे देण्यात आली.
‘सुखन’ मैफल… आकर्षण
तरुण कलाकारांनी सादर केलेला ‘सुखन’ हा उर्दू शेर-शायरीचा कार्यक्रम हे या रंगसंमेलनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. यामध्ये उर्दू शेर-शायरी, गझल, कव्वाली, नज्मे अशा उत्तमोत्तम काव्य प्रकाराचं सादरीकरण होणार आहे. यानिमित्त उर्दू या प्राचीन भाषेचं सौंदर्य रसिकांना नक्कीच उलगडेल. पुण्याचा तरुण कलाकार ओम भुतकर याला उर्दू भाषेत सौंदर्य दिसलं. इतर परदेशी भाषा शिकण्यापेक्षा या भाषेच्या प्रेमात पडून त्यानं सुरू केलेला हा उर्दू मैफलीचा प्रवास प्रेक्षकांना सुखावून जाईल.



























































