…एक प्रदीर्घ प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विद्या कुलकर्णी, पक्षीतज्ज्ञ

हवेहवेसे परदेशी पाहुणे मुंबईत, महाराष्ट्रात गर्दी करू लागले आहेत. कसा असतो यांचा मैलोन् मैलाचा प्रवास…

स्थलांतर हे अनेक प्रजातींच्या जीवनचक्राचा घटक आहे. स्थलांतरण हे मोसमी आधारावर होते. अन्न उपलब्धता, पूर्वस्थितीपासून संरक्षण, प्रजनन संधी किंवा इतर पर्यावरणीय घटकांविषयी अधिक अनुकूल परिस्थितींचा फायदा घेण्यासाठी प्रजाती प्रवास करतात.

हिंदुस्थानात थंडीची सुरुवात होते व पक्षीप्रेमींना एक सुंदर भेट मिळते. सर्व जगातून पक्ष्यांचे थवेच्या थवे हिंदुस्थानात येतात व सर्व पक्षीप्रेमी कॅमेरे घेऊन घराबाहेर पडतात. मुंबईतील हिवाळ्यात येणारे रोहित पक्षी तर जगात प्रसिद्ध आहेत, परंतु जगात अजून बऱ्याच पक्ष्यांच्या जाती आहेत, ज्या हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात हिंदुस्थानात मुक्कामास येतात. पट्टकादंब, पिवळा धोबी, रंगीत पाणवाला, शाहीन ससाणा, करकरा क्रौंच, शंकर, शेकाटय़ा, निळ्या शेपटीचा राघू, गुलाबी मैना, पांढरा झोळीवाला इ. इ. यांच्या प्रवासाची थोडी माहिती करून घेऊया.

पट्टकादंब – या पक्ष्यांचा स्थलांतरातील प्रवास हे जगातील एक आश्चर्यच मानले जाते. हे पक्षी साधारण दरवर्षी 3,000 ते 5,000 किलोमीटर प्रवास करतात. ऑक्सिजन नाही? काही हरकत नाही, या पक्ष्यांच्या शरीरात मिटोकाँड्रिया निर्माण होतो व त्यामुळे त्यांना ऑक्सिजन मिळतो. हे पक्षी कदाचित एकावेळी सर्वात जास्त वेळ उडणार नाहीत, परंतु समुद्र पातळीवर उपलब्ध ऑक्सिजनच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणातील हवामानात हिमालय ते ओलांडतात आणि 7,000 मीटर उंचीपर्यंत पोहोचतात. तेही कोणत्याही मदतीशिवाय. संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे की, दिवसा ते जमिनीला कवटाळून राहतात व फक्त रात्रीच्या वेळी उडतात, अशा प्रकारे जरी ते ऊर्जा वाचवू शकले तरीही वैज्ञानिकांना त्यांच्या विलक्षण प्रतिकारशक्तीबाबत कुतूहल आहे.

आर्क्टिक सुरय – आर्क्टिक सुरयच्या ‘रेकॉर्ड-ब्रेकिंग फीट’चा उल्लेख केल्याशिवाय कोणत्याही पक्षी स्थलांतरणाची यादी कधीही पूर्ण झाली नाही. प्राण्यांच्या साम्राज्यातील सर्वात लांब प्रवास मध्यम आकाराचे हे पक्षी 90 हजार किलोमीटर (55,923 मैल) ध्रुवापासून ध्रुवापर्यंत दरवर्षी प्रवास करतात. ग्रीनलँडपासून ते उत्तर समुद्रापर्यंत. उल्लेखनीय म्हणजे आर्क्टिक सुरय 30 वर्षे जगू शकतात.

शाहीन ससाणा – हे पक्षी त्यांच्या हवाई अॅक्रोबॅटिक्ससाठी ओळखले जातात. हे सर्वात वेगवान पक्षी आहेत. ते हवेतच शिकार करू शकतात आणि पकडू शकतात. पृथ्वीवर सर्वत्र सापडणारा हा पक्षी फक्त पोलर भागात मिळत नाही. स्थलांतरादरम्यान शाहीन ससाणा शेकडो मैल उडू शकतात.

करकरा क्रौंच – या पक्ष्याचे प्रजनन केंद्र मध्य आशियामध्ये आहे आणि बहुसंख्य पक्षी दक्षिण-उत्तर-पश्चिम हिंदुस्थानातील वाळवंटात (1,000 ते 3,000 पक्ष्यांच्या संख्येने) एकत्र येतात. कारण राजस्थान आणि गुजरातमध्ये कोरडय़ा जमिनी आहेत. लहान गट उत्तर व मध्य हिंदुस्थानात येतात. ‘ब्लू सिटी’च्या 140 किलोमीटर अंतरावर असलेल्या खिचन गावात अंदाजे 15,000 पक्षी दरवर्षी येतात. तेथील रहिवासी त्यांची खूप काळजी घेतात. बरेच वर्षांपासून हे पक्षी या गावात येतात. सुरुवात 50 पक्ष्यांपासून झाली. या गावातील लोकांनी त्यांची इतकी काळजी घेतली. त्यांना धान्य खायला दिले. आजूबाजूच्या तलावांमधून पाणी दिले, अशा अगत्यामुळे दरवर्षी यांची संख्या वाढून आता ती हजारांवर गेली आहे. हे पक्षी लष्करातील शिस्तीप्रमाणे वागतात. प्रथम एक गट पुढे येतो, दाणे घेऊन उडून जातो. नंतर पुढील गट याप्रमाणे सर्व पक्षी उडून जातात. संध्याकाळी हे पक्षी परत येतात तेव्हा सर्व आकाश झाकोळून जाते.

शेकाटय़ा – थंड प्रदेशामध्ये राहणारे काळा पंख असलेले हे पक्षी हिवाळ्यात उष्ण प्रदेशात पोहोचण्यासाठी बराच लांब प्रवास करतात. जरी हे पक्षी बऱयाचदा एकाकीपणात प्रजनन करीत असले तरी हिवाळ्याच्या प्रवासादरम्यान हजारो गटांमध्ये आढळतात.

काळ्या शेपटीचा पंकज – लांब चोच, काळ्या शेपटीचा पंकज एक अतिशय मोहक पक्षी आहे. उडताना त्याच्या पंखांवरचे काळे-पांढरे पट्टे व पॅच सहजपणे दिसू शकतो. हे पक्षी युरोप व सायबेरियामधून आशिया खंडात कित्येक मैलांचा प्रवास करून येतात.

रोहित – रोहित सामान्यतः अप्रवासी पक्षी आहेत. तथापि त्यांच्या प्रजनन क्षेत्रातील हवामान आणि पाण्याच्या पातळीतील बदलांमुळे रोहित पक्ष्यांचे वास्तव्य कायमस्वरूपी नसते. हिवाळ्यामध्ये हिंदुस्थानात कमी थंडीच्या भागात स्थलांतर करतात. त्यांना पाणथळीच्या जागा प्रजननासाठी व पोषणासाठी उपयुक्त होतात म्हणूनच मुंबईमध्ये मोठय़ा संख्येने येतात.

पिवळा धोबी – स्थलांतराच्या आधी थोडे दिवस हे पक्षी आपले स्नायू बळकट करतात व त्यामुळे त्यांच्या लिपिड प्रोफाइलमध्ये बराच फरक येतो. शक्ती वाढल्यामुळे त्यांना स्थलांतर करणे सोपे होते.

निळ्या शेपटीचा राघू – हा एक प्रवासी स्थलांतरित पक्षी साऊथ ईस्ट आशियामधून हिंदुस्थानात येतो व शक्यतो पेनिन्सुला भागात आढळतो. हा अतिशय रंगीबेरंगी सुंदर पक्षी शेतात किंवा पाणथळीच्या जागी अंडी घालतो.

[email protected]