हे हृदयीचे ते हृदयी घातले!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अदिती सारंगधर

प्राण्यांशी सुसंवाद साधणे कितीजणांना शक्य होते…? प्राण्यांशी बोलता येतं… हो… हा सगळा संवेदनशील मनाचा… हृदयाचा भाग असतो..

अनुपमा मुखर्जीचे काही तरल अनुभव…

अनुपमाने अवनीशी साधलेला संवाद हाताने लिहिला जात असला तरी डोक्यात असंख्य प्रश्न होते. स्वतःसाठीचे… तिच्यासाठीचे…

आमचा पाचजणांचा ग्रुप आहे, जो अवनीशी संवाद साधत होता. अवनीला काही बछडे आहेत. त्यांच्याशी संवाद साधत होता. आमच्यामधील एक फक्त बछडय़ांशी बोलत होती. आई कुठे आहे… आई आता नाही… घाबरलेली, भेदरलेली मुलं… जंगलात आत लपून बसली होती. आम्हाला त्यांच्याशी संवाद साधताना भीती अशी होती की, मार्ग काढून आम्ही पोहोचेपर्यंत कुणी आधीच त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचाही समाजाला घातक म्हणून संहार केला तर… त्यांना अजून घाबरवलं तर… अवनी आमच्याशी जनरली संवाद मध्यरात्रीच्या सुमारास साधायची. साधारण 12 ते पहाटे 4 च्या मध्ये. एका रात्री मी झोपले, पण अचानक खूप अस्वस्थ वाटायला लागलं. डोळ्यांसमोर बछडय़ांच्या समोर निर्भीडपणे उभी ठाकलेली अवनी दिसली. झोपायचा प्रयत्न केला तरी पुनः पुन्हा तेच दृश्य समोर येत होतं. मी तिच्याशी बोलायचा… कनेक्ट व्हायचा प्रयत्न केला तर नेहमीपेक्षा संयमित… थंड… शांत मुद्रा होती तिची. जणू तिला जे काही पोहोचवायचं होतं… सांगायचं होतं ते तिने याआधी मला सांगितलं होतं.

‘आता माझी जायची वेळ झालीये, पण माझी मुलं सुखरूप आहेत याचा आनंद आहे. तरीही आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय’ म्हणत शांत मुद्रेने ती इन्फिनिटीकडे चालायला लागली. त्याच सुमारास सेम फिलिंग घेऊन इतर चारही जणांचा मला फोन आला. अस्वस्थ… अवनीशी साधलेला शेवटचा संवाद… त्यानंतर मात्र रांग लागल्यासारखी वन्य जीवांच्या मृत्यूची बातमी यायला लागली. रेल्वे ट्रकमध्ये सापडलेले (मृत अवस्थेत) वाघाचे दोन बछडे, तीन माकडांचा मृत्यू, अचानक रानात झालेला वाघाचा मृत्यू आणि आज जेव्हा आर्टिकल लिहायला बसले तेव्हा वाचलं तो ‘छोटी तारा’च्या बछडय़ांपैकी एका बछडय़ाचा इलेक्ट्रिक शॉक बसल्याने झालेला अपघाती मृत्यू… खरंच…? डोक्यात अवनीचं वाक्य घुमायला लागलं. ‘आमची परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झालीय.’

अनुपमा म्हणाली, लहानपणापासूनच प्राण्यांशी असणारं माझं नातं इतकं संगत होतं… मला कळायचं त्यांना माझ्याकडे येऊन काय सांगायचंय… जसं मिश्तीचं झालं. अचानक येऊन चाटायला लागली, तर तिची खूप ऍग्रेसिव्ह असणारी आई बाहेर आली. त्या ब्रीडरला वाटलं आता ही येऊन माझ्यावर अटॅक करणार. कारण तिच्या मुलांना कुणी हात लावलेला तिला आवडत नाही, पण थेट डोळ्यात बघत शांतपणे माझ्या दिशेने चालत आली आणि पायावर डोकं ठेवलं. ती म्हणाली मला, ‘तू माझ्या बाळाला घरी घेऊन जा.’

असंच आणखी एक आठवणारा प्रसंग म्हणजे… मी अनेकवेळा प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये जात असते. ऍडॉप्शनसाठी, फॉस्टेरिंग करायला… अशीच एकदा गेले होते. एक अक्षरशः जळलेलं माकड होतं. मी दुसऱया मैत्रिणीच्या पेटला बघायला गेले होते. विजेचा शॉक लागून त्या माकडीणीचं मूल गेलं होतं आणि कुणीतरी तिला आणून इथं टाकलं होतं. बराच वेळ झाला तरी ती निर्जीव बसलेली माकडीण डोळ्यांसमोरून जात नव्हती. शेवटी समोर जाऊन बसले. खरं तर मी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करत होते, पण तिला प्रचंड वेदना होत होत्या. बोलता येत नव्हतं. 2-3 दिवस व्यवस्थित उपचार केल्यावर जेव्हा संवाद साधला तेव्हा ती म्हणाली, ‘मला जगायचंय. मला मनुष्याचा राग आलाय. त्याच्यामुळं माझं बाळ दगावलं. तिला शांत केलं आणि घरी घेऊन आले. आमचे कुत्रे, मांजरी यामध्ये तीही एक… पूर्ण बरी होईस्तोवर… शारीरिक आणि मानसिकरीत्या बरोबर राहिली. एक दिवस ‘मला जायचंय’ म्हणाली. मी तिला वन्य संरक्षक व्यक्तीला सुपूर्द केलं. सुखरूप..

अनेकांचे प्राणी संवादाचे अनुभव ऐकून, वाचून खरं तर थँक्स टू जीवलग… त्यामुळे असं काही असतं हे मला समजलं. मी खूप वाचन केलं आणि अनेकांशी बोलले तेव्हा समोर आलेले शेयर करते.

अॅनिमल कम्युनिकेशन म्हणजे पूर्णतः टेलीपथीचा भाग असतो. सचेतन संवेदनांच्या फ्रिक्वेन्सीज पकडायच्या. त्या मॅच करायच्या आणि योग्य पट्टय़ात दोस्ती झाली की आपोआप समोरचा बोलता होतो. अनेक घरांत प्राण्यांबरोबर असणारे त्याच्या मालकाची (आईवडिलांची, भावाबहिणींची) नाती सुधारलीत… असाच एक समोर आलेला प्रसंग…

एका फॅमिलीकडे लॅबरडॉर होता. तसं पाहता सगळ्यात शांत आणि शहाणी कुत्र्यांची जात कुठली असेल तर लॅब आणि पग्ज… तर साधारण 2 वर्षांपर्यंत अत्यंत शांतपणे राहणारा, नित्याने फिरायला जाणारा, व्यवस्थित दोनवेळा जेवणारा आणि ‘हॅपी गो लकी’ असणारा बोझो… चिडचिड करायला लागला. मालक सोडून सगळ्यांच्या अंगावर भुंकायला लागला. जेवण जेवेनासा झाला. रस्त्यावर तर फिरायला तयारच होईना. डॉक्टरांकडे नेऊन आणलं, ब्लड रिपोर्टस् चेक केले, तर थायरॉईड झाल्याचं लक्षात आलं. बाकी काही नाही. गोळ्या सुरू केल्या तर बोझो नॉर्मल होईना… शेवटी ऍनिमल कम्युनिकेटरने संवाद साधायचा प्रयत्न केला. आधी बोलेचना… अवघडलेपणाने तिसऱया दिवशी बोलला. त्याने रस्त्यावरच्या कुत्र्याला वॉकला गेलेलं असताना गाडीने उडवलेलं बघितलं. त्याच्याबरोबर वॉकला असणाऱया काकांना हा प्रसंग आठवला, पण ते तेथून निघून आले. बोझो म्हणाला, मला भीती वाटली. गाडीची भीती वाटते आता. मला असं काही झालं तरी सगळे असेच निघून जाणार… हळूहळू बिहेवियर थेरपिस्टच्या मदतीने त्याचं मत आणि मतपरिवर्तन करण्यात आलं, पण त्याला 7 महिने लागले.

आणखी एक अनुभव असा… एका फॅमिलीमध्ये 2 वर्षांची मॉली नावाची कुत्री होती. पॉमेरिअन. 2 वर्षांनी त्या फॅमिलीमध्ये जुळ्या मुली झाल्या. सहाजिकच तिच्याकडून लक्ष थोडं डायव्हर्ट झालं आईचं… पण नोटीस केलं की, मॉली पूर्वीपेक्षा शांत आणि सुस्त झालीये… काही झालं का म्हणून कम्युनिकेट केलं गेलं तेव्हा लक्षात आलं. ती म्हणाली, आईवर आता तीन मुलींची जबाबदारी आहे. मला माझी आई आवडते. मी खूप अटेन्शनची अपेक्षा केली तर आईला त्रास होईल. आई दमून जाईल. मी मोठ्ठी झालीये, पण बाबांनी मला रोज वेळेवर फिरायला नेलं पाहिजे. त्यानंतर मुली 8 वर्षांच्या होईपर्यंत मॉलीने अक्षरशः मोठ्ठय़ा ताईसारखं सांभाळलं त्यांना. ती गेली तेव्हा आमची एक मुलगी जवळजवळ महिनाभर आजारी होती.

पण ऍनिमल कम्युनिकेशन करताना कधी कधी खूप त्रासही होत असेलच ना…? मी अनुपमाला विचारलं. ती म्हणाली, त्रास नाही होत, पण आपम त्यांना होणारा त्रास शमेपर्यंत, तो त्रास दूर होईपर्यंत इमोशनली इन्वॉल्व मात्र असतो पूर्णतः… पण एथिक्सनुसार प्राण्याला त्याच्या मालकाची किंवा मास्टरची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही नाही शक्यतो कम्युनिकेट करत. तुला वाटतंय ना… मग तूसुद्धा त्यांच्याशी बोलू शकतेस अगं… इटस् प्युअर हार्ट टू हार्ट… सोल टू सोल कनेक्शन. मागच्या आर्टिकलमध्ये लिहिलं होतं त्याचीच री पुढे ओढत पुन्हा सांगते, निसर्गाशी हेच हार्ट टू हार्ट कनेक्शन असणं खूप गरजेचं आहे आज. त्यासाठी जंगलं वाचवणं, नैसर्गिक संपत्तीचा ऱहास होण्यापासून टाळणं हे एका माणसाचं काम नाही…

चला, या अवनीमुळे प्रबळपणे लढणाऱयांच्या मोहिमेत स्वच्छेने सहभागी होऊया… आर्टिकल लिहिणे आणि वाचणे या पलीकडचं नातं जोडूया… दुवा साधूया…