
सामना प्रतिनिधी । मुंबई
पुणे येथील ‘पुष्पगंगा व्हेंच्युअर्स’ने संगीत जगतात पदार्पण केले असून ‘पेहली गूंज’ हा आपला पहिला हिंदी गाण्यांचा अल्बम सादर केला आहे. या अल्बममधून ‘व्हॉइस इंडिया किडस्’ आणि ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय संगीत कार्यक्रमात आपल्या यशस्वी कामगिरीने नाव व प्रसिद्धी मिळविलेल्या दोन गायकांनी या अल्बममधून पदार्पण केले आहे.
‘पुष्पगंगा व्हेंच्युअर्स’चे व्यवस्थापकीय संचालक अम्मुल गोयल म्हणाले, ‘आम्ही या तीन तरुण गायकांची गाणी या अल्बमद्वारे सादर करून आम्ही त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचे ठरवले आहे. यापुढची पायरी म्हणजे या गायकांच्या संगीत मैफलींचे देशभरातील सर्व प्रमुख शहरांत तसेच परदेशांतही आयोजन करणे. यामध्ये पुणे, मुंबई, बंगळुरू, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा, नागपूर, चंदिगड व जयपूर या प्रमुख शहरांचा समावेश असेल. हे तीन गायक म्हणजे अक्षता संब्याल (15), प्रशांत सिंग कलहंस (17) व जसु खान मीर (14). ‘पेहली गूंज’ या अल्बममध्ये मैत्री, प्रेम, इमानदारी व देशभक्ती अशा विविध भावभावनांचा आविष्कार घडवणारी गाणी आहेत. हे गीतलेखन गीतकार प्रशांत इंगोले याने केले आहे. अल्बममधील पाच गाण्यांपैकी दोन गाण्यांचा व्हिडीओ आज सादर करण्यात आला. यातील ‘पुछ भी नही’ या गाण्याला श्रेयस पुराणिक याने संगीत दिले असून ‘यारा तेरी यारी’ या गाण्याला विक्रम माँट्रोज याने संगीत दिले आहे.





























































