
सामना प्रतिनिधी, नगर
कीटक वर्गामध्ये अंतर्भूत असलेले “फुलपाखरू” हे त्याच्या वैविध्यपूर्ण व आकर्षक रंगांमुळे व त्याच्या फुलांभोवतालच्या मनोवेधक हालचालींमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेते. त्याच्या या गुणांमुळेच त्याच्यावर अगणित कथा व कविता आत्तापर्यंत लिहिल्या गेल्या आहेत व या कथा-कवितांचा इयत्ता पहिलीपासुन सर्व इयत्तांच्या अभ्यासक्रमामध्ये समावेशही केला आहे. इयत्ता चौथीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात तर फुलपाखरांच्या जीवनावस्था दर्शविणारा संपुर्ण पाठच अंतर्भूत केलेला आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करता पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शाळेतील शिक्षक व निसर्गअभ्यासक श्री.जयराम श्रीरंग सातपुते सर यांनी शाळेत एक नाविण्यपुर्ण प्रदर्शन भरविले. फुलपाखरांच्या प्रत्येक जीवनावस्था प्रत्यक्ष पाहणे हा अतिशय दुर्मीळ असा योग असताना या प्रदर्शनाच्या माध्यमातुन फुलपाखरांच्या जीवनावस्थांचा प्रवास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली.
फुलपाखरांचे जीवन खुपच अल्प असुन तितकेच प्रचंड कुतूहल निर्माण करणारे असे असते, फुलपाखरांचे आयुष्य चार ते पाच आठवडे इतके असते.फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोष व फुलपाखरू या मुख्य अवस्था असतात. विशिष्ट जातींची फुलपाखरे ही काही विशिष्ट प्रकारच्या झाडांवरच अंडी(Eggs) घालतात. ही अंडी शक्यतो पानांच्या मागे अशी घातलेली असतात की शत्रुंना सहजा सहजी सापडू नयेत. यांचा रंगही पानांशी मिळताजुळता असतो. यांचा आकार खूप लहान म्हणजे अगदी मोहरीच्या दाण्याएव्हढा असतो.
अंडी घातल्यानंतर त्यातून एका आठवड्याच्या आसपास अळी बाहेर येते. फुलपाखराच्या अळीस सुरवंट(Catterpiller)म्हणतात. सुरवंट खूप खादाड असतो. कोवळ्या पानांचा, कळ्यांचा, फुलांचा,फडशा पाडायला तो सुरुवात करतो. ही अवस्था साधारण १५ ते २० दिवस असते.सुरवंटाची वाढ पूर्ण झाली की ती एखादी सुरक्षित जागा शोधतो आणि त्या जागी स्थिर होते व स्वत:भोवती कोष (Pupa) तयार करतो.सहा ते बारा दिवसांत कोषातील अळीचे रूपांतर फुलपाखरात होते व ते फुलपाखरू (Adult) कोषाला भेग पाडून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्याचे पंख ओलसर आणि दुमडलेले असतात. तास ते दीड तासात पंख सुकवुन त्यांची हालचाल सुरू होते. यानंतर पूर्ण वाढ झालेले मनोवेधक फुलपाखरू झेप घेऊन पुढील जीवनप्रवासास तयार होते.
फुलपाखरांच्या या जीवनावस्थांवर आधारित असलेल्या प्रदर्शनामधुन विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचे प्रत्यक्षात अध्ययन झाले. फुलपाखरांची अंडी कशी असतात व ही अंडी देताना फुलपाखरू काय काय काळजी घेते,अंडीतुन बाहेर आलेले सुरवंट वनस्पतींची पाने कशी कुरतडुन खातो, सुरवंटाचे कोशात रूपांतर कसे होते हे झाल्यावर त्याचे हळुहळु कसे अवस्थांतर होऊ लागते व शेवटी त्या कोशातुन फुलपाखरू बाहेर येऊन आकाशात कशी भरारी घेते यांचा निरीक्षणातुन अनुभव घेताना विद्यार्थी अक्षरक्ष:हरखुन गेले होते.निसर्गातील अशा विविध घटकांबद्दल संवेदनशिलता जपत त्यांची हानी होवु न देता त्यांचे शास्ञशुद्ध निरीक्षण कसे करावे व त्यांच्या नोंदी कशा ठेवाव्यात याचेही मार्गदर्शन या प्रदर्शनातुन केले गेले.
दिवसभर शाळेतील तसेच गावातील विद्यार्थी,पालक व ग्रामस्थांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. या प्रदर्शनाचे उद्धाटन केंद्राचे केंद्रप्रमुख मा.संतोष नरवडे सर यांनी केले. तर उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक मधुकर चव्हाण, उपाध्यापक -राजु वांढेकर, गोरक्ष उदार, सुरेखा नरवडे, उल्का कांबळे, मुमताज सय्यद, साजेदा शेख आदींनी परिश्रम घेतले. गटशिक्षणाधिकारी कोलते मॅडम,शिक्षणविस्तारअधिकारी श्री.कराड,श्री.भवार यांचे या उपक्रमास प्रोत्साहन लाभले.



























































