माझी सगळी इच्छा पूर्ण झाली असे म्हणत, मुलीच्या लग्नाच्याच दिवशीच पित्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

एकुलत्या एका मुलीचा लग्न सोहळा आनंद आणि उत्साहात साजरा करत असतानाच वधू पिता मंजित रायभान कोळेकर (५०) यांनी लग्नघटिकेसमीप गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले परंतु आत्महत्येचे कारण त्यांनी चिठ्ठीत दिले नाही.

मल्हार सेवा संघ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मंजित कोळेकर (रा. श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी) यांच्या मुलीचे सोमवारी दुपारी सव्वाबारावाजेच्या सुमारास अंबिका लॉन्सवर लग्न होते. घरामध्ये लग्नाची लगबग सुरू झाली होती. लग्न मंडपामध्ये मंजित कोळेकर दिसत नव्हते म्हणून त्यांचा मुलगा कुलदीपने मित्राला खोलीवरून वडिलांना बोलवून आणण्यास सांगितले. कुलदीपचा मित्र खोलीवर आला असता त्याने दरवाजा ठोठावला मात्र आतून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्याने खोलीत डोकावून पाहिले असता स्वयंपाकखोलीतील छताला मंजित यांनी साडीने गळफास घेतलेला दिसला. मित्राने तातडीने कुलदीपला कॉल करून माहिती दिली. कुलदीपने घरी धाव घेत  एमआयडीसी सिडको पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मंजितला अर्धवट बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

माझी इच्छा पूर्ण झाली

मंजित रायभान कोळेकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीला उद्देशून सुसाईड नोट लिहिली. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असून शेवटची इच्छा आहे की, माझे देहदान करावे. मी स्वखुशीने आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये त्यांनी म्हटले आहे. सुसाईड नोट लिहिली असली, तरी आत्महत्या का केली, हे मात्र उशिरापर्यंत समजू शकले नाही.