
सामना प्रतिनिधी । मुंबई
अवाचे सवा वीज बिलांमुळे उपनगरातील हजारो ग्राहक अदानी इलेक्ट्रिसिटीविरोधात रस्त्यावर उतरलेले असतानाच आता वीज कामगारांनीही रस्त्यावर उरण्याचा इशारा दिला आहे. कामगारांच्या वेतनवाढीबरोबरच अन्य सोयीसुविधा देण्याबाबत दोन वर्षांपूर्वी कामगार आयुक्तांपुढे व्यवस्थापन आणि मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनमध्ये करार झाला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवार, 21 डिसेंबर रोजी वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
उपनगरातील वीज कामगारांच्या वेतनवाढीसह इतर सोयीसुविधा देण्याबाबत 2016 मध्ये रिलायन्स एनर्जी आणि युनियनमध्ये करार झाला आहे. कंपनीचे रिलायन्सकडून अदानीकडे हस्तांतरण करताना मागील सर्व कराराचे पालन करण्याचे अदानी व्यवस्थापनाने मान्य केल्याचे संघटनेचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानुसार कंत्राटी कामगारांना सेवाज्येष्ठतेनुसार कायम करणे, कामगारांच्या मुला-मुलींना कायम सेवेत घ्यावे, आर.एच.आर.एम, जीआयएस पद्धतीने काम करणाऱया आयटी विभागातील कामगारांना कायम करावे, बिल वितरण, सुरक्षा रक्षक आदी कामगारांना किमान वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र अदानी व्यवस्थापनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर करारातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत म्हणून म्हणून शुक्रवारी मोर्चा काढणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
कॉर्पोरेट कार्यालय गुजरातला नेण्यास विरोध
आतापर्यंत बोरिवली पश्चिमेला असलेले वीज कंपनीचे कार्यालय गुजरातला नेण्याच्या हालचाली अदानीने सुरू केल्या आहेत. त्याला कामगारांना तीव्र विरोध केला असून व्यवसाय मुंबईत, ग्राहक मुंबईत, कामगार मुंबईत असताना कार्यालयच गुजरातला का नेता, असा सवाल विठ्ठलराव गायकवाड यांनी करत व्यवस्थापनाचा हा डाव हाणून पाडण्याचा इशारा दिला आहे.




























































