सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात गोळी सुटली, ‘शूटींग’वेळी तरुण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी व्हिडीओ तयार करत असताना एका तरुणाच्या हातातील बंदूकीतून चुकून झालेल्या गोळीबारात त्या तरुणाचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. विजय यादव असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर ठाण्यातील वेदांत रुग्णालयात अतिदक्षता विभागाच उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विजयचा मित्र अक्षय पवार याला अटक केली आहे.

मंगळवारी संध्याकाळी अक्षय पवार, विजय यादव व अवधेश यादव हे ठाण्यातील किसन नगर भागातील गोदामात एका व्हिडीओचे शूटींग करत होते. या व्हिडीओसाठी त्यांनी गावठी बंदूक देखील आणली होती. दरम्यान शूटींग सुरू असताना अक्षयच्या हातून चुकून बंदूकींतून गोळी झाडली गेली व ती गोळी विजयला लागली. यात गंभीर जखमी झालेल्या विजयला त्याच्या मित्रांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केलं.

याप्रकरणी पोलिसांनी अक्षयला अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी अक्षयवर एखाद्याचा जीव धोक्यात घालणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच पोलीस सध्या त्याची चौकशी करत असून त्यांनी हे बंदूक कुठून आणले याचा तपास करत आहेत.