नगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पाथर्डी

शहरातील अतिक्रमणे हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र बुधवारी रात्री व गुरुवार दुपारपर्यंत अनेक छोट्या व्यावसायिकांनी या मोहिमेविरोधात न्यायालयात धाव घेतली.

ही मोहीम आणखी दोन दिवस चालू राहणार असल्याचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले असले तरीही ही मोहीम राबवताना प्रशासनातील गोंधळ सुद्धा उघडकीस आला. या बाबत अधिक माहिती अशी कि चालू आठवड्यात अतिक्रमणाच्या मुद्यावर शहरात झालेल्या आंदोलना नंतर आज प्रशासनाने अतिक्रमण मोहीम सुरु केली. ही मोहीम सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने दवंडी देऊन आपली अतिक्रमणे काढा असे आवाहन केल्यानंतर काल रात्री पासूनच अनेकांनी आपली अतिक्रमणे काढून घेतल्याने शहरातील अजंठा चौक,नाईक डॉ. आंबेडकर चौक,नवीपेठ,येथील रस्ते मोकळे झाले तर न्यायालयाच्या इमारती लगत काही जणांनी केलेले अतिक्रमण आज त्यांनी स्वतःहून काढले.जुन्या बसस्थानका च्या लगत काही छोट्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली असून हि दुकाने आपल्या हद्दीत येतात असा दावा परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला मात्र तो करताना आपली हद्द नेमकी कोणती आहे ती स्पष्टपणे त्यांना सांगता न आल्याने तहसीलदार नामदेव पाटील यांनी अगोदर आपली हद्द निश्चित करा त्या नंतर ही अतिक्रमणे आहे कि नाही ते निश्चित करत कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.

बांधकाम विभागाच्या हद्दीत काही व्यावसायिकांनी 1967 साला पासून आपली दुकाने उभी केली असून या दुकानदारांशी पालिकेने करार करत दर वर्षी व्यवसायकर गोळा केला आहे. या व्यावसायिकांना आज बांधकाम विभागाने आपली अतिक्रमणे काढून टाकण्याच्या नोटीस तातडीने बजावल्या मात्र ज्या नोटिसा दिल्या त्या मध्ये तारीख,जावक क्रमांक,कोणत्या अधिकाऱ्याने या नोटीसा दिल्या त्याची सही व शिक्का तसेच हि नोटीस ज्या व्यावसायिकांना दिल्या त्याचे नाव सुद्धा नसल्याने एकूणच नोटिसा मिळलेले व्यावसायिक गोंधळून गेले आहेत.

शेवगाव रोड लगत अनेकांनी अतिक्रमणे केली असली तरीही यातील अनेक अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेऊन जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश मिळवल्याने या अतिक्रमणधारकांवर आज कारवाई करण्यात आली नाही.या विषयावर आता प्रशासनाने सरकारी वकिलांचा अभिप्राय मागवला असून त्या नंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे. शेवगाव रोड लगत काही आदिवासी महिलांनी अतिक्रमण केले होते त्या महिला बुधवारी झालेल्या आंदोलनानंतर निघून गेल्या आहेत. आज बांधकाम विभागाने शेवगाव रोड च्या एका बाजूला असलेली आपली हद्द निश्चित केली असून उद्या दुसऱ्या बाजूची हद्द निश्चित केल्या नंतर कारवाई करण्यात येणार आहे. या रोड लगत आपल्या हद्दीत दोन व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली असल्याची तक्रार बाजार समिती प्रशासनाने निदर्शनास आणून दिल्या नंतर हि अतिक्रमणाने काढून घेण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले तर तहसील कार्यालयाच्या समोर असलेली अतिक्रमणे आज चार नंतर जेसीबी च्या साहाय्याने पाडण्यात आली. आणखी दोन दिवसात कुठली अतिक्रमणे प्रशासन पाडणार या कडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.