
सामना ऑनलाईन, मुंबई
देशात पारशी नावाला उरतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. पारशी समाजाची लोकसंख्या वेगाने घटत होती. पण 2014पासून राबवण्यात येणाऱ्या ‘जिओ पारसी’ मोहिमेने पारशी समाजाला जणू संजीवनीच दिली. या मोहिमेमुळे देशात पारशींची सरशी झाली आहे. त्यांची लोकसंख्या 18 टक्क्यांनी वाढली आहे.
‘जिओ पारसी’ मोहिमेला पारशी दांपत्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळेच हा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. या मोहिमेचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला. त्याचा शुभारंभ वाळकेश्वर येथील रतन टाटा इन्स्टिटय़ूट येथे आज करण्यात आला. या वेळी देश-विदेशातील पारशी तरुण-तरुणी उपस्थित होते. पारशी पंचायत, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस आणि झोराष्ट्रीयन अंजुमन्स संघटना आणि पारशी समाजासाठी काम करणारी ‘पारझर’ ही स्वयंसेवी संघटना ‘जिओ पारसी’ ही मोहीम केंद्र सरकारच्या मदतीने राबवत आहे. केंद्र सरकार या मोहिमेसाठी 5 कोटी रुपये तर आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी 5 लाख रुपयांचे अनुदान देते.
या कार्यक्रमात अभिनेत्री नौहीद सायरसी, पारशी समाजाचे जर्मन अभ्यासक अँतोन झेकॉव्ह, लारा बलसारा, सॅम बलसारा, कैयान मिस्त्राr, डॉ. शेहनाझ कामा, राज नायर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी जिओ पारशी दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
‘जिओ पारशी’ची उद्दिष्टे
- तरुण-तरुणींनी अविवाहित राहू नये म्हणून प्रयत्न.
- लवकर लग्न करण्यासाठी प्रोत्साहन
- लग्नानंतर लगेच मुले जन्माला घालण्यावर भर देणे.
- एकापेक्षा जास्त मुलांना जन्म देण्यावर भर.
- उशिरा विवाह झालेल्या जोडप्यांना ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाचा वापर करून मातृत्व मिळवून देणे.
‘जिओ पारशी केअर’
- बालक आर्थिक सहाय्य-ज्या पती-पत्नींचे आर्थिक उत्पन्न वर्षाला 15 लाखांपेक्षा कमी आहे, अशा जोडप्यांना मुले 8 वर्षांची होईपर्यंत दर महिन्याला 4 हजार रुपये दिले जाणार आहेत.
- वृद्धांना सहाय्य-पारशी समाजातील मुले 10 वर्षांची होईपर्यंत सांभाळ करणाऱ्या वृद्धांना महिन्याला 3 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
- वृद्धांना सांभाळणाऱ्या जोडप्यांना सहाय्य – पती-पत्नीबरोबर राहणाऱ्या वृद्धांचा सांभाळ करण्यासाठी दरमहा 4 हजार रुपये देण्यात येतील. त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न 10 लाखांपेक्षा कमी असावे, अशी अट आहे.
बरेचशे पारशी अविवाहित
देशात पारशी बांधवांची संख्या केवळ 57 हजार इतकी आहे. त्यातच जन्माला येणाऱ्या प्रत्येकी 10 पारशी बालकांमधील 8 बालकांचा मृत्यू होतो, असा अहवाल आहे. पारशी समाजात इतर धर्मांतील मुलामुलींबरोबर विवाह केला जात नाही हेसुद्धा त्यामागचे एक कारण असल्याचे तज्ञ मंडळी सांगतात. लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी मिळत नाही म्हणून बरेचसे पारशी अविवाहित राहतात आणि लग्न झाले तरी एकाच मुलाला जन्म देण्यावर त्यांचा भर असतो, असे दिसून आले आहे.





























































