5 राज्यातील पराभवानंतर योगी आदित्यनाथांची लोकप्रियता घसरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, लखनऊ

पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या प्रसिद्धीला ओहोटी लागल्याचं चित्र बघायला मिळतंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही याचा फटका बसला असून त्यांची लोकप्रियता 5 टक्क्यांनी घटल्याचं एका सर्वेक्षणातून कळालं आहे. अॅक्सिस माय इंडिया आणि इंडिया टुडेने हे सर्वेक्षण केलं असून त्यांनी त्यांच्या अहवालात उत्तर प्रदेशात योगी यांच्याविरोधात नाराजी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचंही म्हटलं आहे.

तीन महिन्यांपूर्वी याच संस्थेने उत्तर प्रदेशात सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात आदित्यनाथ यांची लोकप्रियता 43 टक्के इतकी होती जी आता 38 टक्क्यांपर्यंत खाली घसरली आहे. या सर्वेक्षणात मुख्यमंत्रीपदासाठीची पसंती कोणाला असाही प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर 37 टक्के लोकांनी अखिलेश यादव यांना पसंती दिली आहे. तीन महिन्यापूर्वी त्यांना 29 टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती. योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्यातील लोकप्रियतेचं अंतर आता फक्त एक टक्का राहल्याचं या सर्वेक्षणानंतर स्पष्ट झालं आहे. बसपच्या अध्यक्षा मायावती यांच्याही लोकप्रियतेला गळती लागल्याचं सर्वेक्षणाद्वारे सांगण्यात आलं आहे. पूर्वी त्यांना 18 टक्के जनतेची पसंती होती मात्र आता ती घटून 15 टक्के झाली आहे.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शिवराजसिंह चौहान आणि रमणसिंह यांना 44 टक्के जनतेची पसंती होती. अनेक वर्ष सत्तेत असूनही त्यांची लोकप्रियता कमी झाली नव्हती. आदित्यनाथ यांची लोकप्रियता मात्र झपाट्याने कमी व्हायला लागल्याची ही चिन्ह असल्याचं सर्वेक्षणाद्वारे सांगण्यात आलं आहे.