
सामना प्रतिनिधी। हिंगोली
जिल्हयातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरात पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या नीलगायीचा विहीरीत पडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी 7 च्या सुमारास ही नीलगाय राजेश जाधव यांच्या शेतातील विहीरीत पडली. हिंगोली जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे मुक़्या प्राण्याचा मृत्यु होण्याची ही या वर्षातील पहिली घटना आहे.
रामेश्वर येथील ग्रामस्थाच्या हि बाब लक्षात येताच तात्काळ वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. मात्र वन विभागाच्या नेहमी प्रमाणे वेळकाढू धोरणामुळे अखेर गावकऱ्यांनी स्वताचा जिव धोक्यात घालुन दोरी च्या सहाय्याने विहीरीत उतरून निलगायीला विहीरी बाहेर काढले. हे धाडस ग्रामस्थ नितीन जाधव या युवकाने केले. त्यांना राजेश जाधव, विष्णु राठोड, सुरज जाधव, अमोल राठोड संजय जाधव, अरविंद जाधव, वनमजुर सुरेश जाधव यांनी सहकार्य केले. जिल्ह्यात डिसेंबर महिन्यातच दुष्काळाच्या झळा जानवत असून ग्रामस्थां बरोबर आता वन्य प्राण्यांना ही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या वतीने पानवठे उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.
या घटनेची तात्काळ माहिती ग्रामस्थांनी वनविभागाचे रेंजर देवरे, राउंड ऑफीसर टाक, फड यांना देवून ही त्यांनी लवकर घटनेची दखल न घेतल्याने ग्रामस्थामंधून नाराजी व्यक्त होत आहे. वनविभागाचे नेहमीच वरातीमागुन घोडे असल्याचा प्रकार दिसून येत आहे.






























































