
सामना ऑनलाईन, मुंबई
‘जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल दि वे’ असे गाणे गात मंजूळ घंटानाद करीत पालिकेचा सांताक्लॉज मुंबईच्या रस्त्यावर ‘स्वच्छतेचा संदेश’ देत आहे. या वेळी बच्चे कंपनीला गिफ्टही मिळत असल्यामुळे त्यांच्याकडून या अनोख्या सांताक्लॉजचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. सध्या हा सांताक्लॉज ‘एन’ विभागात विक्रोळी, घाटकोपरमध्ये लोकांशी संवाद साधत आहे.
स्वच्छ मुंबईसाठी पालिकेकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर लहान मुलांसह मोठय़ांनाही आकर्षण असलेल्या सांताक्लॉजच्या माध्यमातून नववर्ष स्वागताच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. आज सुरू झालेल्या या उपक्रमाला विक्रोळी-घाटकोपरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांच्या मदतीने ‘एन’ विभागातील महत्त्वाच्या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती ‘एन’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी दिली.
सर्व विभागांत उपक्रम राबवा
– 25 डिसेंबरपासून सुरू झालेला हा उपक्रम 31 डिसेंबरपर्यंत राबवला जाणार आहे. या उपक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता इतर विभाग कार्यालयांनीही असा उपक्रम राबवावा, असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.
– या उपक्रमात रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या रहिवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतानाच ‘ग्रिटिंग कार्ड’देखील गिफ्ट म्हणून दिले जात आहे. सांताक्लॉजला भेटण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी लहानग्यांसोबत मोठय़ांचीही गर्दी होत आहे.





























































