
सामना ऑनलाईन, ठाणे
शेजारील इमारतीतील इस्त्रीवाल्यासोबत नातेवाईकांच्या झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी 21 वर्षीय गौरव पालवी याने येथील चंदनवाडी भागात 18 बाईक जाळल्याचा विचित्र प्रकार आज पहाटे समोर आला. नौपाडा पोलिसांनी अवघ्या आठ तासांत या घटनेचा वेगवान तपास करत गौरवच्या मुसक्या आवळल्या.
चंदनवाडी येथील अल्मेडा रोडवरील हनुमान सोसायटीत उभ्या दुचाकी अचानक पेटल्याची माहिती पहाटे मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे या पथकाने गुह्याचा तत्काळ तपास करून स्थानिक गौरव पालवी याला अटक केली. त्याचे नातेवाईक असलेल्या रोशन दळवी यांचा येथील लॉंड्रीचालक प्रशांत भोईरसोबत वाद झाला होता. त्यावरून भोईर याला धडा शिकवण्यासाठीच गौरवने एकटय़ा भोईरची गाडी पेटवली. मात्र या ठिकाणी दाटीवाटीने दुचाकी उभ्या असल्याने 18 बाईक्स आगीत जळून खाक झाल्या.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा डाव फसला
या घटनेनंतर गौरव पोलीस पथकासोबतच फिरून त्यांना घटनेची माहिती देत होता. त्याचवेळी पोलिसांना येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये गौरवच्या शरीरयष्टीशी मिळताजुळता व्यक्ती आगीनंतर पळताना दिसला. अखेर पोलिसीखाक्या दाखवताच त्याने गुह्याची कबुली दिली. या भागातच अवघ्या 20 दिवसांपूर्वी दोन तरुणांनी क्षुल्लक वादातून नऊ दुचाकी पेटवल्या होत्या.
























































