भयंकर दुष्काळ; बीड जिल्ह्यात टँकरचा आकडा 180 च्या घरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

भीषण दुष्काळाने दाही दिशा होरपळून निघाल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. अडी, विहिरी तळ गाठू लागल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. जसजसा दुष्काळ रौद्र रूप धारण करीत आहे तसतसे बीड जिल्ह्यात पाण्यासाठी टँकरची संख्या वाढत आहे. आज 180 टँकरने पाणी पुरवठा होत आहे.

आगामी चार दिवसात हा आकडा 200 च्या घरात जाणार असून बीड जिल्ह्यात भविष्यामध्ये 1200 टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी रोज टँकरची मागणी वाढत आहे. टँकर मंजूर करण्याचे अधिकार आता उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत. टँकर मंजुरीमधील अनेक क्लिष्ट नियम बाजूला ठेवण्यात आले आहेत. 26 डिसेंबर रोजी 180 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. 31 डिसेंबरपर्यंत टँकरची संख्या 200 च्या घरात जाणार आहे. रोज टँकरच्या मागणीचे प्रस्ताव महसूल प्रशासनाकडे धडकत आहेत. भविष्यात हाच टँकरचा आकडा तब्बल 1000 ते 1200 च्या घरात जाणार आहे. जूनपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाला 55 कोटी रूपयाची तरतूद करावी लागणार आहे. अनेक मोठ्या गावांसह वाडा, वस्ती, तांड्यावर पाण्याचे दुर्भिक्ष्य झाले आहे. बहुतांश प्रकल्प आणि तलाव कोरडेठाक पडले आहेत. घराघरात असणारी आडे आणि विहिरींनी तळ गाठला आहे. पाणी पुरवठा टँकरद्वारे केला जाईल मात्र टँकर भरायचे कोठे हा ही प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो.