अन्न सुरक्षा योजनेअंतर्गतचा धान्य पुरवठा वाढीव करा – जयदत्त क्षीरसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बीड

राज्यभरात दुष्काळी भागात अन्न सुरक्षे योजनेअंतर्गत धान्य कपात करणे ही गंभीर बाब असून आस्मानी संकट ओढवलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने या योजनेतील धान्य पुरवठा वाढीव करावा अशी मागणी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

दोन दिवसापूर्वी राज्य शासनाने धान्य वाटपाबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये महिन्याला केवळ मानसी तीन किलो धान्य देण्याचे नियोजन केले आहे. दुष्काळी भागात प्रति मानसी पंधरा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ देणे आवश्यक आहे. सध्या ग्रामीण भागात जनता मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. या वर्षी दोन्ही हंगाम वाया गेले असून यामुळे धान्य उत्पादन झाले नाही. कपाशीचे पिक आधी बोंडअळीने तर नंतर दुष्काळामुळे पाण्याअभावी वाया गेले. शेतकरी कुटूंबात उत्पादनावर अधारित आर्थिक व्यवहार असतो. घरातील मुलांना शिक्षणासाठी बाहेर गावात ठेवलेले असते.

कुटुंबाचा खर्च भागवून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवावा लागतो अशा आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी धान्य कपात करणे ही गंभीर बाब असून बीड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता असतांना त्यावरील उपाय योजना शासनाने जाहीर केल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झालेली दिसत नाही. केवळ टँकर काही प्रमाणात सुरू आहेत, बीड जिल्ह्यात रेशन दुकानदारांना केवळ पंचवीस टक्के धान्य मिळत आहे. या परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने शासनाने गांभीर्याने विचार करून वाढीव धान्य पुरवठा तत्काळ सुरू करावा अशी मागणी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.