
सामना प्रतिनिधी । मुंबई
सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत टीव्हीवर ‘मुंगी डान्स’ होणार हे अगोदर केबलवाल्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे गुरुवारी घराघरात ‘प्राइम टाइम’ला खूप वर्षांनी कौटुंबिक गप्पा रंगल्या आणि पोटमाळ्यावर अडगळीत पडलेल्या कॅरम, बुद्धिबळाचा पटही बाहेर आला. आजचा प्राइम टाइम हा खऱ्या अर्थाने कौटुंबिक टाइम होता.
‘ट्राय’ने टीव्ही चॅनेल्सचे दर निश्चित केले आणि केबलवाले संतापले. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज प्राइम टाइम अर्थात सायंकाळी तीन तास केबलच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे घडलेही, टीव्हीवर मुंगी डान्स सुरू झाला.
एरवी ‘अज्या-शीतली’चे काय होणार, मामी आणखी काय उलाढाली करणार याचे टेन्शन असते किंवा विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकरच्या स्टोरीतील ‘लव्ह’ शोधण्याचा खटाटोप सुरू असतो. कुकरमध्ये भात लावायचा आणि बैठक मारून टीव्हीसमोर बसायचे हा जणू दिनक्रमच बनला होता. अख्खं कुटुंबच जणू टीव्हीला ‘तुला पाहते रे’ असे सांगत असावे अशी स्थिती होती.
आज मात्र टीव्हीचा नक्षा साफ उतरला. कुटुंबाने प्राइम टाइमला चक्क गप्पा हाणल्या. वडिलांनी मुलाचा अभ्यास घेतला. वहिनींनी शेजारणींसोबत कॅरमवर सोंगटय़ाही ढकलल्या. जे काही जमले ते फक्कडच होते!
आज महामोर्चा
मुंबई केबल संघटना (कोडा) शुक्रवारी दुपारी 2 वाजता सरकारच्या निषेधार्थ महामोर्चा काढणार आहे. वरळी जांबोरी मैदान ते महालक्ष्मी येथील स्टार मुख्यालयावर हा मोर्चा निघणार आहे. मोर्चाचे नेतृत्व शिवसेना आमदार ऍड. अनिल परब करणार आहेत.




























































