
सामना प्रतिनिधी । कराड
कालवडे (ता. कराड) येथील पाळाक शिवारात भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. ही घटना शुक्रवारी पहाटे समोर आली. परिसरातील ग्रामस्थांसह शेतकर्यांना या घटनेची माहिती मिळताच बिबट्याला बघायला मोठी गर्दी झाली. कालवडे, कासारशिरंबे, नांदगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. ९ तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारच्या सुमारास हा बिबट्या विहिरीतून बाहेर काढतांना धूम ठोकण्यात यशस्वी झाला.
पाळाक शिवारात शिवाजी महादेव थोरात यांची विहीर आहे. शुक्रवारी पहाटे शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकर्याला थोरात यांच्या विहिरीत बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्या शेतकऱ्याने त्वरित या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्याला विहीरीबाहेर काढत असतानाच काठाजवळ येताच बिबट्याने विहीरीबाहेर उडी मारली आणि तो पळून जाण्यात यशस्वी झाला.
हा बिबट्या गुरुवारी मध्यरात्रीनंतर तीनच्या सुमारास थोरात यांच्या विहिरीत पडला होता. जवळपास नऊ तास बिबट्या विहिरीत अडकून पडला होता. पळालेला बिबट्या गाव पंचक्रोशितच असण्याच्या भितीने ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.





























































