
>> प्रा. श्रीपाद माधव नांदेडकर
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांची आज पुण्यतिथी. राजवाडे आणि धुळे शहर यांचा स्नेहबंध काही दशकांचा होता. त्यावर टाकलेला प्रकाश…
विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे नाव समोर आले की, इतिहास समजतो. त्यांना इतिहासाचार्य पदवी बहाल करण्यात आली होती. राजवाडे मूळचे पुण्याचे, पण मग ते धुळ्याला कसे आले, केव्हा आले आणि कशाकरिता आले हाही प्रश्न समोर येतो. 1904 ते 1926 पर्यंत धुळे शहरात येत होते. 1890 मध्ये म्हणजे 26 व्या वर्षी बी.ए. उत्तीर्ण झाल्यापासून त्यांनी अस्सल आणि विश्वसनीय इतिहास साधने शोधण्याच्या खटपटीस प्रारंभ केला. त्यांचा धुळेकर मंडळींशी संपर्क 1903 मध्ये जुळून आला. कोल्हापूर येथून राजवाडे धुळे येथील ऍड. शंकर श्रीकृष्ण देव आणि ऍड. भास्कर वामन भट यांच्या भेटीकरिता 1903 च्या मे महिन्यात सातारा येथे आले होते. राजवाडे यांच्याशी झालेल्या या भेटीचे रूपांतर धुळेकरांशी त्यांचा दृढ परिचय होण्यात झाले. नंतर 1904 पासून ते धुळ्यास यावयास लागले. त्यावेळी ऍड. गोविंद काशीनाथ चांदोरकर यांच्यासमवेत त्यांचा परिचय झाला.
1906 मध्ये चांदोरकरांनी धुळे येथे प्रभात मासिक सुरू केले. त्यात राजवाडे यांचे महत्त्वपूर्ण लेख ऍड. चांदोरकरांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर धुळे येथे ऍड. शंकर श्रीकृष्ण देवांनी 1915 पासून रामदास आणि रामदासी हे मासिक सुरू केले. त्यामध्येदेखील राजवाडे यांनी लिहिलेले श्री समर्थ संप्रदाय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे लेख प्रसिद्ध झाले. राजवाडे यांना एकनाथ महाराज यांच्या पूर्वकालीन ज्ञानेश्वरीची प्रत हवी होती. ती त्यांनी शोधली आणि मिळवली. इ.स. 1909 मध्ये ऍड. शंकर श्रीकृष्ण देवांनी राजवाडे यांच्याजवळील एकनाथ पूर्वकालीन ज्ञानेश्वरी छापून प्रसिद्ध केली. आज या ज्ञानेश्वरीचे फक्त एकच मूळ पान धुळ्याच्या इ. वि. का. राजवाडे वस्तुसंग्रहालयात आहे. हा दुर्मिळ, प्राचीन, अनमोल ठेवा आहे. राजवाडे यांनी 1910 मध्ये पुणे येथे सरदार मेहंदळे यांच्यासमवेत भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. इ. सन 1910 ते 1918 पर्यंत राजवाडे यांचे लेखनाचे आणि प्रकाशनाचे कार्य धुळेकरांच्या सहाय्यानेच सुरू हाते. इ. सन 1912 व 1915 मध्ये त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 15 आणि खंड 20 वा धुळ्यामध्ये छापून प्रसिद्ध केला. राजवाडे यांच्या ऐतिहासिक लेखांना प्रसिद्धी मिळावी म्हणून प्रसिद्धीचे एक नूतन साधन म्हणून इतिहास आणि ऐतिहासिक मासिक धुळ्यात सुरू करण्यात आले. यामध्ये त्यांचे अनेक महत्त्वाचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.
राजवाडे धुळे येथे नियमित येऊ लागले. कारण त्यांचा सांसारिक पाश तुटला होता. ते एकटेच होते. दरवर्षी 7-8 महिने म्हणजे जून, जुलै ते फेब्रुवारी, मार्चपर्यंत त्यांचे वास्तव्य धुळे येते असे. कडक उन्हाळा होऊ लागला म्हणजे ते धुळ्याहून तळेगाव, दाभाडे येथे जात असत. त्यांचे 21 वर्षे जवळ जवळ वास्तव्य धुळ्यात होते, पण एक वर्षच ते भर उन्हाळ्यात धुळे येथे राहिले होते. कुंभाराच्या भट्टीची उपमा त्यांनी धुळ्याच्या उन्हाळ्याला दिली होती.
तसे पाहता राजवाडे एकटेच होते. साहजिकच त्यांना कुटुंबाच्या आठवणी येणारच. कारण मुलगा, मुलगी आणि पत्नीही नाही. राजवाडे यांचा स्वभाव परोपकारी आणि दयाळू होता. तो त्यांनी पुढे जोपासला. पांझरा नदी किनारी फिरावयास जाताना हल्लीच्या पद्मनाभ स्वामी मठाजवळ एक वयोवृद्ध स्त्री मरणोन्मुख स्थितीत पडली होती. राजवाडे यांनी तिला पाहिले व त्वरित मुलांना बोलावून त्या स्त्रीला सरकारी दवाखान्यात पाठविले आणि तेही बरोबर आले. डॉक्टरांना भेटून औषधोपचार करावयास सांगितले. भटांनाच मूळव्याधीचा त्रास होत असताना, योगचिंतामणी या सुप्रसिद्ध ग्रंथातील ‘बाहुशाल गुडपाक’ या नावाचे औषध स्वतःच्या देखरेखीखाली वैद्याकडून तयार करून त्यांनी भटांना दिले व त्यामुळे भटांना आराम पडला. राजवाडेंचा जवळ जवळ 25 वर्षे थोरल्या भावाप्रमाणे सांभाळ करणारे तात्यासाहेब तथा भास्कर वामन भट म्हणजे एक अद्भुत रसायनच होते. राजवाडे अतिशय संतापी, तर तात्यासाहेब अतिशय शांत स्वभावाचे. तात्यासाहेब भट आणि राजवाडे यांचे गुरू – शिष्याचे नाते होते.
1917 मध्ये धुळ्यातही प्लेगची लागण झाली. भट गावाबाहेर झोपडीत राहू लागले. राजवाडे यांच्या झोपडीशेजारील स्वतंत्र झोपडीत वास्तव्य करून ‘महाराष्ट्राचा वसाहत काळ’ हा विस्तृत निबंध त्यांनी पूर्ण केला. खान्देशात आल्यावर धुळे आणि अमळनेर या शहरांमध्ये त्यांनी आरोग्य मंडळाची स्थापना केली. पुण्याप्रमाणे धुळे येथे राजवाडे यांनी आरोग्य मंडळाची स्थापना केली होती. मंडळाच्या सदस्यांनी शहराचे भाग वाटून घेऊन त्या भागातील कचर्याचे ढीग, घाण पाण्याची डबकी, म्युनिसिपालिटीच्या अधिकार्यांना कळवून त्यांचे तत्काळ निर्मूलन करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. राजवाडे यांचा धुळेकर मंडळींशी जरी सन 1904 पासून संपर्क होता तरी धुळ्यात राजवाडे यांच्या मृत्यूपर्यंत इतिहास मंडळाची स्थापना झाली नाही. तोपर्यंत इतिहास संशोधन व संपादनाचे काम धुळे येथे सत्कार्योत्तेजक सभेकडून होत होते. त्यामुळे धुळे येथे इतिहास संशोधनासाठी स्वतंत्र संस्था काढावी असा विचार राजवाडे यांनी कधीही सुचवला नाही असे भास्कर तथा तात्यासाहेब भट यांनी सांगितले आहे. राजवाडे धुळे येथे आले तेव्हा ते आपले शोधनिबंध सत्कार्योत्तेजक सभेत सादर करू लागले आणि धुळ्याच्या आसपासच्या गावातही भ्रमंती करू लागले. राजवाडे यांचे इतिहासातील योगदान मात्र खूप मोठे आहे. आज राजवाडे यांच्या जाण्याचा 92 वर्षे झाली तरी त्यांचे इतिहास संशोधनाचे कार्य अखंडपणे चालू आहे. पुढेही चालणार आहे यात मात्र शंका नाही.
लेखक इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळ, धुळेचे क्युरेटर आहेत.































































