थंडीतली मुलायम त्वचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुलाबी थंडी… गार गार वारा… असं वातावरण सध्या अधूनमधून अनुभवायला मिळतंय…

थंडीत त्वचा कोरडी पडते. त्वचेवर हवामान, वातावरणाचा सतत परिणाम होत असतो. अशा वेळी त्वचेची काळजी वर्षभर घ्यायला हवीच पण हिवाळ्यात जास्त घ्यावी…या दिवसांत त्वचा फुटणे, खरखरीत होणे, कोरडी पडणे, खाज सुटणे असे त्रास होऊ लागतात. त्यासाठी काही महागडी सौंदर्य प्रसाधनंही वापरली जातात. त्याऐवजी  निरोगी, सुंदर त्वचेसाठी काही घरगुती उपायांनीही त्वचेचे पोषण होते.

ओठांच्या सौंदर्यासाठी…

शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक भाग म्हणजे ओठ. नाजूक गुलाबी ओठांनी सौंदर्य अधिक खुलून दिसतं. त्यासाठी हिवाळ्यात ओठांचा ओलसरपणा टिकून ठेवा. ओठांना वारंवार जीभ लावू नका. ओठाची त्वचा खूप नाजूक असल्याने त्यावर हवा आणि थंड वातावरणाचा थेट प्रभाव पडतो. ओठांच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. यासाठी ओठांना व्हॅसलिन अजिबात लावू नये.  पाणी जास्त प्रमाणात प्या आणि झोपताना ब्रँडेड लिप बामचा वापर करा. ओठ फुटू नयेत यासाठी ओठांवर दुधावरची साय लावणे उत्तम. ओठांवरील चिरांवर घरचे ताजे लोणी किंवा घरचे साजूक तूप लावा.

घरगुती उपाय

  • शरीरातील कोरडेपणा कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे अभ्यंग. रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे संपूर्ण अंगाला अभ्यंग तेलासारखे त्वचेला स्निग्धता देणारे तेल लावावे. यामुळे त्वचेला आतून-बाहेरून पोषण मिळते.
  • खोबरेल तेल, ऍरोमा किंवा तिळाच्या तेलानं मसाज करून आंघोळ करावी. वेळ नसल्यास आंघोळीच्या पाण्यातच यापैकी कुठलंही तेल थोड्या प्रमाणात घालावं. म्हणजे त्वचेचं आपोआप मॉइश्चरायझिंग होतं.
  • नियमित अभ्यंगाइतकाच दुसरा प्रभावी उपाय म्हणजे उटण्याचा वापर. उटण्यामध्ये अनंतमूळ, ज्येष्ठमध, वाळा, हळद, दारूहळद अशा अनेक उत्तमोत्तम वनस्पतींचे मिश्रण असते. यामुळे त्वचा स्वच्छ तर होतेच, पण त्वचेवरील दोषही दूर होतात. उटण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे त्वचेला उचित स्निग्धता मिळते, वातावरणातील कोरडेपणामुळे त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो.
  • रात्री बदाम भिजवून, सकाळी त्याची सालं काढून पेस्ट करून ती संत्र्याच्या रसात मिक्स करून लावावी.

कोरड्या त्वचेसाठी

  • ज्यांची त्वचा मुळातच कोरडी आहे , त्यांची त्वचा थंडीमध्ये जास्त सुरकुतलेली दिसते. अशांनी मध आणि लिंबू रस किंवा साखर आणि लिंबू रसानं स्क्रब करावं.
  • घरच्या घरी मॉयश्चरायझर करायचे झाल्यास लिंबूरस, गुलाबपाणी, आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन रोज सकाळी आंघोळीनंतर हातापायांना लावल्यास दिवसभर त्वचा मऊ राहते.