‘पती घरी नाही, मी येऊ का?, भाजपच्या शहराध्यक्षाने केला विवाहितेचा विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या शहराध्यक्षांनी विवाहितेचा विनयभंग केल्याने श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे. संजय यादव असे भाजपच्या शहराध्यक्षाचे नाव आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु यादव हा अद्याप फरार असून लवकरच जेरबंद केले जाईल, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिली.

संजय यादव हा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचा सक्रिय सदस्य आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी त्याच्यावर सध्या युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदाची धुरा दिली आहे. यादव याने शहरातील गोपिनाथनगर भागात राहणाऱ्या 28 वर्षीय वयाच्या विवाहितेला 31 डिसेंबरच्या रात्री फोन केला. ‘तू मला फार आवडतेस. तुझा पती आता घरी नाही. मग मी घरी येऊ का?’, अशी विचारणा केली. पुढे लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले. शिवाय महिलेने याबाबत कुणाला सांगितल्यास तिच्या पतीस खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पीडितेने शहर पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीवरून शहर पोलिसांनी संजय दानबहाद्दूर यादव (रा. अहिल्यानगर, वार्ड नं. 2, श्रीरामपूर) याच्यावरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती मिळताच यादव हा शहरातून पसार झाला. त्याच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असे बहिरट यांनी सांगितले.