
सामना ऑनलाईन, नागपूर
माझा श्रीरामावर पूर्ण विश्वास आहे. अयोध्येत राममंदिर व्हावे ही रामाची इच्छा आहे. त्यामुळे अयोध्येत राममंदिर होईलच, अशी निःसंदिग्ध ग्वाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे दिली. सेवासदन शिक्षण संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या महामुलाखतीत, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येत राममंदिराच्या बांधकामासाठी वटहुकूम काढण्याविषयी विचार केला जाईल असे म्हटले होते. याविषयी विचारले असता मोदींनी राममंदिर होणार नाही, असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त न्यायालयीन प्रकियेनंतर विचार करू असे म्हटले. त्यामुळे मंदिर होईलच, असे सरसंघचालकांनी ठासून सांगितले. राममंदिराला वेळ होतोय असे वाटत नाही का, असे विचारले असता राममंदिराचा मुद्दा 69 वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे तसाही वेळ झालेलाच आहे. पण आता अधिक वेळ होणार नाही. कारण वेळ कधीही बदलू शकते, असे सूचक वक्तव्य सरसंघचालकांनी केले.





























































