
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज पक्षाच्या महाराष्ट्रातील खासदारांची एक बैठक महाराष्ट्र सदनात घेतली. त्या वेळी शिवसेनेशी युती तोडली तर भाजपला राज्यात मोठा फटका बसेल, असे सांगतानाच शिवसेनेशी जुळवून घ्यावे, असा आग्रह बऱ्याच भाजप खासदारांनी धरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
भाजप खासदारांचा शिवसेनेशी युती कायम राखण्याकडे कल असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहा यांनी ‘‘युती करण्याची जबाबदारी आमची आहे. ते आम्ही आमच्या पातळीवर करून घेऊ. त्याचे तुम्ही फार टेन्शन घेऊ नका. आपापल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करा,’’ असे शहा यांनी सांगितले. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियूष गोयल, हंसराज अहिर, सुभाष भामरे या केंद्रातील मंत्र्यांसह महाराष्ट्रातील भाजपाचे सर्वच खासदार आणि भाजपाच्या टेकूवर राज्यसभा गाठलेले नारायण राणेही उपस्थित होते.
बैठकीत शाह यांनी भाजपा खासदारांशी ‘वन टू वन’ संवाद साधला. या वेळी बहुतांश खासदारांनी शिवसेनेशी युती झाली नाही तर आपले काही खरे नाही, ही भीती अमित शाह यांना बोलून दाखवली. शाह यांनी शिवसेनेशी युती ही सत्तेसाठी नाही तर एका विचारावर आधारलेली आहे. त्यामुळे भविष्यात युती होईल. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. हिंदू मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव दिला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. मात्र अगदीच टोकाचा निर्णय झालाच तर तुम्ही तशीही तयारी ठेवा, असा आदेश शाह यांनी खासदारांना दिला.


























































