
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची राज्यात जुलमी ‘शाळा’ सुरू आहे. ‘केजी टू पीजी’ शिक्षण फ्री मिळेल का? असा प्रश्न विचारताना मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश तावडे यांनी दिले. त्याच्या मोबाईलमधील डाटा डिलिट करण्यास त्यांनी पोलिसांना सांगितले. या विद्यार्थ्याने माझी प्रायव्हसी हर्ट केली. त्याला तत्काळ अटक करा, असे आदेश देणाऱ्या शिक्षणमंत्र्यांविरोधात राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही तावडे यांची छी थू होत आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून तावडेंच्या निषेधाची आंदोलने होत आहेत.
प्रशांतबरोबरच असणारा दुसरा विद्यार्थी युवराज दाभाडे याने मोबाईलवर व्हिडियो शुटींग सुरूच ठेवले होते. त्याला पाहताच तावडे संतापले आणि त्यांनी पोलिसांना युवराजला अटक करण्याचे आदेश दिले. त्याच्या मोबाईलमधील शुटींग क्लिप डिलिट करण्यासही सांगितली. युवराजला ताब्यात घेऊन पोलीस त्यांच्या गाडीतून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे त्याचा मोबाईल जप्त करून काही वेळाने त्याला सोडण्यात आले. एक तासाने त्याला पुन्हा ठाण्यात बोलवले गेले. पण त्यावेळी त्याचा मोबाईल आपल्याकडे नसल्याचा दावा पोलिसांनी केला आणि त्याला हुसकावून लावले. पुन्हा काही वेळाने युवराजला फोन आला. त्याला अमरावती विद्यापीठाच्या बाजूला ऑनिमेशन कॉलेज येथे बोलवले गेले. तिथे त्याचा मोबाईल पोलिसांनी त्याला परत दिला. मात्र त्यातील सर्व काही डिलिट करण्यात आले होते.
या घटनेबद्दल राज्यातील विद्यार्थीवर्गात शिक्षणमंत्र्यांबद्दल प्रचंड संताप निर्माण झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी माझी प्रायव्हसी भंग केली असे सांगत शिक्षणमंत्री तावडे यांनी आपल्याला अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. मग आमचा मोबाईलमधला खाजगी डाटा कोणत्या कायद्याने त्यांनी डिलिट केला? असा सवाल प्रशांत आणि युवराज यांनी केला आहे. याबद्दल न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अमरावती येथील श्री शिवाजी महाविद्यालयात माणिकराव गावडे राज्यस्तरीय वत्तृत्व स्पर्धा होती. त्या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री तावडे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना गाठून शिक्षणासंदर्भात प्रश्न विचारले. राज्यात प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत आहे तसेच उच्च शिक्षणही मोफत मिळणार का? असा प्रश्न प्रशांत राठोड या विद्यार्थ्याने विचारला होता. त्यावर शिकू नका, नोकऱया करा असे सांगत तावडे यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
प्रशांत राठोड हा मोबाईलवर व्हिडीओ रेकार्ंडग करत असल्याचे पाहून तावडे यांच्या सहाय्यकाने त्याला हटकले आणि मोबाईल बंद करण्यास सांगितले. दुसरा विद्यार्थी युवराज दाभाडे याने शूटिंग सुरूच ठेवले होते. त्यामुळे तावडे संतापले आणि त्यांनी पोलिसांना युवराजला अटक करण्याचे आदेश दिले.
‘त्यांना’ मतकेंद्रांची चौकीदारी करायला तरुण हवे आहेत
शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही शिक्षणमंत्र्यांच्या या अरेरावीचा ‘ट्विटर’वरून समाचार घेतला आहे. ‘राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्याला अटक करण्याचे पोलिसांना आदेश दिले. का? कारण तो विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारताना मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करत होता. त्यांना तरुण हे मतकेंद्रांची चौकीदारी करण्यासाठी हवे आहेत. तरुणांच्या शिक्षण आणि रोजगाराबाबत त्यांना उत्तरे द्यायची नाहीत.’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.


























































