
सामना प्रतिनिधी, मुंबई
विद्यार्थी -पालकांच्या समस्या आहेत, तक्रारी आहेत त्या सोडवल्याच पाहिजेत, पण त्याबरोबरच शिक्षणपद्धतीत बदल (एज्युकेशन रिफॉर्म्स) हे आता केवळ राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं पुढचं पाऊल असलं पाहिजे. तंत्रज्ञान ही काळाची गरज लक्षात घेऊन शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. त्यासाठी भारतीय शालेय पालक संघ कार्य करेल, असा विश्वास शिवसेना नेते–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
शिवसेना-युवासेनाप्रणीत भारतीय शालेय पालक संघाची स्थापना आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत राजा शिवाजी विद्यालय येथे झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले, देश बदलतोय, जग बदलतंय अशा वेळी शिक्षण क्षेत्रात मागे राहून चालणार नाही. आज आपण जे शिकतोय ते पुढच्या 50 वर्षांसाठी उपयोगी आहे का, हे विचार करण्याची वेळ आली आहे. आपली मुलं पुढे जाऊन कोणते काम करणार, कोणत्या क्षेत्रात जाणार ही चिंता पालकांना सतावत आहे. ही चिंता सोडवण्याच्या दृष्टीनेच भारतीय शालेय पालक संघाची वाटचाल झाली पाहिजे. अशी पालकांसाठी काम करणारी राजकीय संघटना, जगात अन्यत्र कुठेच नाही. राजकारण असले तरी पालकांना पाठिंबा देण्यासाठीच ही संघटना आहे.
मुलांनी कोणत्या क्षेत्रात करीयर करावे याबाबत पालकवर्गाचा गोंधळ उडतो तो लक्षात घेता पालकवर्गाला रिफ्रेशर कोर्स देणे गरजेचे आहे. तसेच शाळा आणि अभ्यासक्रम निवडीबाबत पालकांची प्रीऍडमिशन तयारी होणेही गरजेची असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. लवकरच मोठी शिक्षण परिषद आयोजित करण्याचे स्वप्न असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, शिक्षणतज्ञ, उद्योगपती यांचा समावेश असला पािहजे. त्यातही काहीतरी करू इच्छिणाऱया, बदल घडू इच्छिणाऱया पालकांना मोठय़ा संख्येने सामावून घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी शिक्षणतज्ञ आणि माजी शिक्षण संचालक ज. मो. अभ्यंकर, ग्रोथ सेंटरच्या संस्थापक स्वाती साळुंखे, भारतीय शालेय पालक संघाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे, उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, नगरसेविका श्रद्धा जाधव, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण, शाहीन खान, राकेश भाटकर आदी व्यासपीठावर उपलब्ध होते. यावेळी ज. मो. अभ्यंकर यांचे ‘शालेय अभ्यासक्रम कोणता आणि का? एक अभ्यास!’ यावर व्याख्यान झाले. स्वाती साळुंखे यांनी ‘पालकत्व आणि आव्हाने’ याबाबत मार्गदर्शन केले. भारतीय शालेय पालक संघाच्या लोगोमध्ये पुस्तकावर वाघ आहे. केजी टू पीजीपर्यंतचा कोणताही विषय असू दे, वाघाच्या डरकाळीने कामे होतात, असे साईनाथ दुर्गे म्हणाले.
तावडेंनी माफी मागावी, मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी
केजी टू पीजी शिक्षण फ्री मिळेल का, असा प्रश्न विचारताना मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करणाऱया विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी माफी मागावी. तसेच त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. प्रश्न विचारणे चुकीचे आहे का, की प्रश्नही ‘इंटरह्यू’सारखे ‘प्लॅन’ करायचे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. विद्यार्थी जर मोबाईलमध्ये शूटिंग करीत होता, तर त्याला तसे करू नकोस असे समजावून सांगायला हवे होते. अटक करण्याची ऑर्डर देणे म्हणजे लज्जास्पद आहे. कोणत्याही कायद्याखाली ही अटक केली, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
























































