
सामना प्रतिनिधी, मुंबई
सतत वस्तू आणि खाद्यपदार्थ आणण्याकरिता सांगत असल्याने संतापलेल्या नोकराने हॉटेलमध्ये आलेल्या गेस्टवर चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवारी अंधेरी येथे घडली. हल्ल्याप्रकरणी निशांत शिवण्णा गौडा या नोकराला अंधेरी पोलिसांनी अटक केली. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अंधेरी पूर्वच्या जे. बी. नगर येथे एक हॉटेल आहे. शनिवारी तक्रारदार आणि त्याची आई त्या हॉटेलमध्ये आले होते.
रात्री तक्रारदाराने अर्ध्या तासात पाणी, आईक्रीम, प्लेट आणि केक कापायला चाकू आणण्यास सांगितले होते. चार वेळा ऑर्डर केल्यामुळे गौडा संतापला. संतापलेला गौडा हॉटेलच्या किचनमध्ये गेला. किचनमधून चाकू घेऊन तो तक्रारदाराकडे गेला. त्यानंतर गौडाने तक्रारदाराच्या मानेवर चाकूने हल्ला केला. तर मध्यस्थी करण्याकरिता गेलेल्या तक्रारदाराच्या आईच्या मानेला चाकू लागल्याने त्या जखमी झाल्या. चाकूहल्ल्याची माहिती तक्रारदाराने हॉटेलच्या अधिकाऱयांना कळवली. हल्ल्याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.
































































