
सामना प्रतिनिधी । नगर
महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर निवडणुकीवेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाच्या विरोधात जाऊन भाजपला पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे नेते आता घाबरले आहेत. पक्षाच्या कारवाईच्या भितीमुळे प्रत्येक जण ‘तो मी नव्हेच’ हे सिद्ध करण्याची धडपड करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी आपल्यावर होणारे आरोप खोटे आहेत हे सांगण्यासाठी एक पत्रकारपरिषद घेतली. त्यामुळे भाजपला पाठिंब्याचा निर्णय घेणारे कोण याचा शोध राष्ट्रवादी पक्षात सुरूच आहे.
महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेतला गेला. ही आघाडी अभद्र आहे, अशी टीका करत मी या प्रक्रियेत नसताना, आता माझ्यात पक्षातील काही पदाधिकारी माझ्या नावाची बदनामी करत आहेत जर हिंमत असेल तर त्यांनी ग्रामदैवत विशाल गणपतीसमोर येऊन तसे जाहीर करावे, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले.
भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी मंत्री गिरीश महाजन यांना आपल्याकडे आणून अडचणीत आणले, अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कळमकर म्हणाले की महापौर निवडीच्या वेळी महानगरपालिकेमध्ये भाजप बरोबर केलेली आघाडी अभद्र असून वास्तविक पाहता भाजपाला पाठिंबा देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका असताना स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला व त्यांनी हे कृत्य केले आहे. मी त्यांच्यासमवेत नव्हतो. मी फक्त तीन बैठकांना उपस्थित होतो. या तीन बैठका पक्षाच्या होत्या, पण यामध्ये मी स्पष्टपणे भाजपाला पाठिंबा देऊ नका, असे सांगितले होते. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्याशी आपले दोन वेळा बोलणे झाले होते, मात्र ज्या वेळेला निर्णय घ्यायचा होता त्यावेळेला मला अंधारात ठेवले गेले व यांनी परस्पर निर्णय घेतला. कारण त्यांना त्यांच्या समवेत जायचे होते, असे यावरून आता सिद्ध झाले आहे. मला काही सांगितले नाही ही बाब मी वरिष्ठांच्या निदर्शनास आणूनही दिलेली आहे. शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये शिवसेना-भाजपबरोबर जायचे नाही असे त्यांनी सांगितले होते. तसेच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा अशा प्रकारच्या सूचनाही दिलेल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी न करता भाजपला जाहीर पाठिंबा दिला, त्यामुळे राष्ट्रवादी डॅमेज झाला असल्याची कबुली कळमकर यांनी दिली.
महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर मला आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी फोन केला व आम्ही भेटायला येत आहोत असे सांगितले व माझ्याबरोबर मंत्री गिरीश महाजन आहेत असेही त्यांनी सांगितले. कोणी घरी आल्यावर आपण त्यांचे स्वागत करतो ही आपली संस्कृती आहे. मात्र आमदार कर्डिले हे समवेत पुष्पगुच्छ घेऊन आले होते आल्यावर त्यांनी माझा स्वताहून सत्कार केला व त्यानंतर चे फोटो या ठिकाणी काढण्यात आले. त्याचा दुरुपयोग करून ते सर्वत्र सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमांना देऊन एक प्रकारे माझी बदनामी केली, हे मला नंतर कळले. वास्तविक पाहता कोणत्याही प्रक्रियेत नसताना माझे नाव कसे घेतले गेले असा प्रश्न उपस्थित झाला म्हणून मला हा सर्व प्रकारच्या खुलासा करावा लागत आहे, असे कळमकर यांनी म्हटले आहे.
हे कृत्य चुकीचे असून एक प्रकारे आमदार कर्डिले यांनी हे षडयंत्र केले आहे, असा घणाघाती आरोपही दादाभाऊ कळमकर यांनी केला आहे. यानंतर आपली सर्व बदनामी करण्यात आलेली आहे, त्यामुळे ही बाब वरिष्ठांकडे निदर्शनास आणून दिलेली आहे असेही त्यांनी सांगितले,
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी माझ्या नावाची आता बदनामी करू लागले आहेत. मला कोणाचे नाव घ्यायचे नाही जर कोणामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी ग्रामदैवत विशाल गणपती यांच्या समोर यावे व या ठिकाणी आपण प्रक्रियेत होतो की नाही हे जाहीर करावे, असे आव्हानही कळमकर यांनी यावेळी दिले आहे.
महापौर पदाच्या निवडीनंतर झालेला प्रकार पक्षाच्या लक्षात आला असून संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करायची हा वरिष्ठ पातळीवरचा प्रश्न आहे. मात्र कारवाईचे पाऊल उचलावे लागेल असेही कळमकर यांनी स्पष्ट केले. भाजपाला मदत केल्यामुळे याचा संदेश हा नुसता राज्यातच नाही तर देशात गेला आहे त्यामुळे राष्ट्रवादी डॅमेज झाली आहे, असेही कळमकर यांनी म्हटले आहे.असे असलेतरी लोकसभेवर कोणताही परिणाम होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
मी गेल्या चाळीस वर्षापासून पवार यांच्या बरोबर काम करत आहे पक्षाच्या विविध पदांवर मी काम केले आहे. आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप यांना सुद्धा मी पक्षात आणलेलं आहे. तसेच अनेक पदाधिकारी सुद्धा पक्षांमध्ये मी आणले आहेत. शहर जिल्हाध्यक्षपद सुद्धा मीच घेऊन दिले आहे. त्यामुळे मी माझे काम केलेले आहे. मात्र राजकीय सोयीसाठी कोण काय करत असेल त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले.






























































