हाल दी बेस्ट! संपामुळे टॅक्सी-रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best-2
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

सुमारे 27 लाख मुंबईकर प्रवाशांची आज कोंडी झाली. ‘बेस्ट’च्या संपामुळे एकही बस रस्त्यावर न धावल्याने प्रवाशांना ‘हाल दी बेस्ट’च्या भयंकर अनुभवाला सामोरे जावे लागले. टॅक्सी-रिक्षाचालकांनी पाचपट भाडे आकारून त्यांची मनसोक्त लूट केली. प्रवाशांना नाइलाजास्तव आपला खिसा रिकामा करावा लागला. ज्यांना परवडले नाही त्यांना लोकलच्या गर्दीत धक्के खात कार्यालये गाठावी लागली.

‘बेस्ट’चे कर्मचारी विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले. त्यामुळे 3200 बसेसपैकी एकही बस आज रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे दररोज ‘बेस्ट’ बसने प्रवास करणाऱया लाखो प्रवाशांचे हाल झाले. याचा गैरफायदा टॅक्सीचालकांनी उठवला. शेअरिंग प्रवासासाठी आकारल्या जाणाऱया 10-20 रुपयांच्या जागी आज मुंबईत अनेक ठिकाणी टॅक्सीचालकांनी तब्बल 50 ते 100 रुपये घेतले. शेअरिंगव्यतिरिक्त प्रवास करण्यासाठी 30 ते 40 रुपयांच्या जागी तब्बल 300 रुपये मोजावे लागले. एरवी नाक्यानाक्यावर उभे राहून प्रवाशांना बोलावून, विनंती करून शेअरिंग सुविधा देणाऱया टॅक्सीचालकांनी आज लांबची भाडे आकारल्याने अनेक ठिकाणी शेअरिंग बंद होते. उपनगरात रिक्षाचालकांकडूनही प्रवाशांना तसाच अनुभव आला. रिक्षाचालकांनी आज मीटर डाऊन न करताच मनमानी भाडी आकारली. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये खटके उडाले. संपाचा त्रास विद्यार्थ्यांनाही भोगावा लागला. अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही जादा भाडे देऊन परीक्षा केंद्रे गाठावी लागली.

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करावा, कामगारांच्या मागणी पत्रावर चर्चा करावी, निवृत्त कर्मचाऱयांना ग्रॅज्युटी, संपलेला वेतन करार पुन्हा करावा, दिवाळी पूर्वी जाहीर केलेले 5500 रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, कर्मचाऱयांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवावा आदी मागण्यांसाठी बेस्टच्या कामगार कृती समितीने संपाची हाक दिली आहे.

‘ओला-उबेर’चा दर वाढला
सोयीचा आणि स्वस्त प्रवासासाठी अनेक वेळा नोकरवर्गाच्या पसंतीच्या ओला-उबेरनेही ‘बेस्ट’ संपाचा चांगलाच फायदा उठवला. ओला-उबेरने अनेक ठिकाणी दहा टक्के वाढीव भाडे आकारले. गाडय़ा कमी आहेत आणि मागणी जास्त आहे असे कारण देत ही दरवाढ केली गेली. लोकलचे धक्के खाण्यापेक्षा थोडा खिसा रिकामी करून कामावर जाण्यासाठी हा मार्गही अनेकांनी पत्करला.

सीएनजी गॅससाठी पाच कि. मी. रांगा
दररोज प्रवासी शोधणाऱया रिक्षा-टॅक्सीचालकांना आज उसंत नसल्याने अनेक गाडय़ांमधील गॅसही लवकर संपत होता. त्यामुळे मुंबई सेंट्रल, प्रभादेवी, आर्थर रोड आदी अनेक पेट्रोल पंपांवर तब्बल चार ते पाच किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या.

रेल्वे, मेट्रोचाही जादा फेऱ्यांचा दिलासा
बेस्ट संपामुळे रेल्वे आणि मेट्रोकडून अतिरिक्त फेऱया चालवून प्रवाशांना दिलासा दिला. सायंकाळी सहापर्यंत मेट्रोने घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर 12 फेऱया चालवल्या. मध्य रेल्वेने दुपारी ठाणे ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते कल्याण अशा दोन फेऱया चालविल्या तर हार्बरवर वाशी ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते पनवेल अशा दोन फेऱया चालविण्यात आल्या. पश्चिम रेल्वेनेही प्रवाशांच्या सोयीसाठी चर्चगेट ते गोरेगाव, चर्चगेट ते अंधेरी आणि चर्चगेट ते वांद्रे अशा सहा आणि रात्री आणखी सहा अशा 12 फेऱया चालविल्या.

लाल परी मदतीला धावली
बेस्ट संपामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांच्या मदतीसाठी राज्य शासनाची लाल परी धावली. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरूनगर व ठाणे विभाग 1 व 2 या आगारांमधून ठाणे-बोरिवली, दादर-मंत्रालय यादरम्यान जादा एसटी बसगाडय़ा सोडण्यात आल्या.

शिवसेनेमुळे संप यशस्वी
कामगारांच्या रास्त मागण्यांसाठी शिवसेनेने या संपाला नैतिक पाठिंबा दिला होता. त्यामुळे हा संप 100 टक्के यशस्वी झाला. आज दिवसभरात एकही गाडी रस्त्यावर धावली नाही. तर केवळ 25 चालक आणि वाहक उपस्थित होते. या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याबरोबर झालेल्या बैठकीला बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ उपस्थित होते. या बैठकीला आयुक्तांनी कामगार सेनेच्या प्रतिनिधींबरोबर आणि कृती समितीच्या प्रतिनिधींबरोबर वेगवेगळी चर्चा केली. शशांक राव यांच्यासोबत झालेल्या चर्चेला राव यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यानंतर आयुक्तांनी कामगार सेनेच्या प्रतिनिधींसोबत बरोबर चर्चा केली. कामगार सेनेच्या प्रतिनिधींसोबत नंतर संध्याकाळी देखील पालिका आयुक्तांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीनंतर कामगार सेनेने या संपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

बसगाड्या वेळेवर धावणार
शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनने आपल्या अस्तित्वासाठी पुकारलेला बेस्टचा बेमुदत संप बारगळला आहे. शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेने या संपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून बसगाडय़ा वेळेवर धावणार आहेत. शिवसेनेने पाठिंबा काढल्यामुळे शशांक राव याच्या संघटनेचे हे आंदोलन पंक्चर होणार आहे.

कामगार सेनेला चर्चेचे आमंत्रण
कामगार सेनेचे बेस्टमध्ये 11 हजार सदस्य असून बेस्ट वर्कर्स युनियनचे 13 हजार सदस्य आहेत. कामगार सेनेची सदस्य संख्या मान्यताप्राप्त संघटनेच्या तोडीस तोड असल्यामुळे बेस्ट प्रशासनाने 9 जानेवारीला कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिले असल्याची माहिती सुहास सामंत यांनी दिली. या चर्चेदरम्यान तोडगा निघेल असा विश्वास रंजन चौधरी यांनी व्यक्त केला.

तीन कोटींचे नुकसान
संपामुळे बेस्ट उपक्रमाला दर दिवशीच्या तीन कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. तर 10 बसगाडयांचे नुकसान झाले.

बंदोबस्तात गाडय़ा बाहेर पडणार
उद्या पासून कामगार सेनेचे कामगार रुजू होणार असले तरी कृती समितीच्या आंदोलकांकडून त्यांना विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था व पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी बेस्ट प्रशासनाने दाखवली आहे.

कृती समितीचा अडमुठेपणा
पालिका आयुक्त कामगार संघटनांबरोबर चर्चेसाठी आधी तयार नव्हते. कृती समितीला आयुक्तांबरोबर बैठक हवी होती ती बैठक आज घडवून आणली. मात्र मेस्मा लागू असल्यामुळे संघटनेबरोबर चर्चा करू शकत नाही असे प्रशासनाचे म्हणणे होते. संप मागे घेण्याची कृती समितीला विनंती केली पण ते दोन पावले मागे हटायला तयार नव्हते – आशिष चेंबूरकर, अध्यक्ष, बेस्ट समिती

शशांक राव यांची अस्तित्वाची लढाई आणि मुंबई वेठीस
बेस्टची आर्थिक स्थिती पाहता बेस्टला एक दिवसाचा संपही परवडणारा नाही. मात्र शशांक राव यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी हा संप करून बेस्टला व मुंबईला वेठीस धरले आहे. लवकरच बेस्टच्या कामगार संघटनांची निवडणूक आहे. तीसमोर ठेवून आपले सदस्य वाढवण्यासाठी हा संप म्हणजे वातावरण निर्मिती होती. मात्र यामुळे बेस्ट कामगार देशोधडीला लागण्याची भीती होती – सुहास सामंत, अध्यक्ष , बेस्ट कामगार सेना